कराड / प्रतिनिधी :
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक देशांमध्ये हाहाकार झाला होता. अनेक जणांनी प्राण गमावले होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात सगळ्याच देशांनी पूर्ण लॉकडाऊन केले होते. जनजागृतीतून जग सावरत असतानाच व कोरोनावरील लस आता अंतिम टप्प्यात असताना इंग्लंड मधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे इंग्लंडची विमान सेवा तात्काळ थांबवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
या आगामी संकटावर भाष्य करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आहे की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे इंग्लंडमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. यावर केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलत इंग्लंडमधून येणारी विमानसेवा कोरोना विषाणूविषयीच्या नव्या संसर्गावर स्पष्टता येईपर्यंत तात्काळ स्थगित करावी व तेथून आलेल्या सर्व प्रवाशांना अलगीकरणात ठेवावे. कोरोनाचा हा नवीन विषाणू “आऊट ऑफ कंट्रोल” आहे असे ब्रिटनमधील संसदेत तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
युरोपमधील इतर देशांनी सतर्कता दाखवत इंग्लंड मधून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर व बोटीद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. याआधी आलेल्या कोरोना विषाणूवेळी आपल्या देशात उशिरा सतर्कता दाखविल्यामुळे व लॉकडाऊनच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे मोठी जीवितहानी झाली होती तसेच सर्वच क्षेत्राना मोठा फटका बसला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सतर्कता दाखवून इंग्लंड मधून भारतात येणारी विमान वाहतूक तात्काळ स्थगित करावी जेणेकरून भारतावर नवीन संकट ओढवणार नाही. भारतीयांचे जीव वाचविणे प्राधान्य असल्याने केंद्र सरकारने त्यानुसार देशात अंमलबजावणी करावी.









