आपण सर्वांनी केव्हा ना केव्हा नुडल्स खाल्लेले असतातच. अनेक जण तर नेहमी या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतात. या नुडल्स प्रामुख्याने पांढऱया किंवा गव्हाळी रंगाच्या असतात. लाल रंगाच्या नुडल्सही उपलब्ध आहेत. पण आपल्या बशीत जर काळय़ा रंगाच्या नुडल्स दिसल्या तर आपल्याला कसे वाटेल? प्रथमदर्शनी त्या खाववणारही नाहीत. त्या नुडल्स न वाटता कोणते तरी लांबसडक जीव शिजवून आपल्याला सर्व्ह करण्यात आले आहेत, असे वाटण्याची शक्मयता अधिक. तथापि, थायलंडमधील एका रेस्टॉरंटमध्ये काळय़ा रंगाच्या नुडल्स सर्व्ह करण्यास प्रारंभ झाला आहे. त्या नेहमीप्रमाणेच आहेत.

इन्स्टाग्रामवर या नुडल्सचा एक व्हिडिओही प्रसारित होत आहे. तो पाहिल्यानंतर कित्येकांना या काळय़ा रंगाच्या नुडल्सची शिसारी येते, असा अनुभव त्यांनी शेअर केलेला आहे. तथापि, त्या खाल्लेल्यांचे मत मात्र वेगळे आहे. त्या अतिशय चवदार असून सुरुवातीची आपली नकारात्मक भावना दूर झाली की त्या आवडू लागतात, असा अनुभव अनेकांनी कथन केला आहे. या नुडल्स नेहमीच्या पद्धतीने आणि त्याच पदार्थांपासून बनविलेल्या असून त्या काळय़ा दिसण्यासाठी खाण्यायोग्य काळय़ा रंगाचा उपयोग करण्यात आला आहे. तथापि, त्यांच्याबद्दल अनेकांचे गैरसमज मात्र अनोखे आहेत. अशा अन्नपदार्थांमुळेच जगभरात कोरोना पसरला, अशीही प्रतिक्रिया एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. एकंदर या नुडल्सना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची प्रसिद्धी भलतीच मिळालेली दिसून येते. हा प्रकार केवळ थायलंडपुरताच मर्यादित राहणार नसून आज ना उद्या भारतातही तो उपलब्ध होईल. थायलंडमध्ये काही गाडय़ांवरही तो उपलब्ध आहे. भारतातही तो येण्यास वेळ लागणार नाही.









