अध्याय चौदावा
संसारातील आसक्ती सुटण्यासाठी वैराग्य अंगी बाळगणे आवश्यक आहे. वैराग्य आलं की, माणसाला कोणतीही इच्छा रहात नाही. मग अमुक एक घडावं किंवा अमुक एक घडू नये असं वाटण्याचा प्रश्नच उरत नाही. हे समजल्यावर उद्धवाने भगवंतांना विनंती केली की, देवा, मुमुक्षूने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे, हे मला सांगा. त्यावर भगवंत म्हणाले, तुला मी प्रथम आसन आणि प्राणायाम याबद्दल सविस्तर सांगतो. कारण ध्यान करण्यापूर्वी आसनजय आणि प्राणायाम साधणं आवश्यक आहे. फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे. हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी. आता बसण्यासाठी व्याघ्रचर्माचे आसन केले तर मोक्षसिद्धी प्राप्त होते. पांढऱया कांबळय़ाचे आसन केले असता मोक्ष आदिकरून नानाप्रकारच्या अनेक सिद्धी साधकांना प्राप्त होतात. जमीन निर्मळ आणि सपाट असून कोणाचा उपद्रव नाही असे स्थान पाहावे आणि तेथे पुढे सांगितलेल्या अनुक्रमाने उत्तम लक्षणांनी युक्त असे आसन तयार करावे. दर्भ, वस्त्र, कांबळी, कातडे, ह्यांनी तयार केलेले आसन घालावे. ते उंच किंवा सखल होऊ नये. चहूकडून सारखे असावे. आसन उंच झाले तर ते डुलू लागते आणि सखल झाले तर भूमिदोष लागतात.
याकरिता आसन घालावयाचे ते सपाट व सारखे, कोमल आणि मऊ असावे. तेथे शुद्ध मुद्रा लावून वज्रासन किंवा कमलासन घालावे. अथवा ज्या आसनामध्ये मनाला आनंद वाटेल असे सहजासन घालावे. मग पाठीचा कणा बाक येऊ न देता चांगला ताठ ठेवावा, शरीर अगदी सारखे ठेवावे आणि मूलाधारादी सुप्रसिद्ध तीन बंध ते नीट रीतीने साधावेत. असे आसन लावले असता त्या आसनावर आपोआप करकमलाचे दोन्ही पसरलेले पंजे दोन्ही मांडय़ांवर उताणे ठेवले म्हणजे शोभिवंत दिसतात. नंतर नाकाचा शेंडा दूर सोडून नाकाच्या फक्त अग्रभागावरच दृष्टी धरावी. तेथेच अग्निचक्र असून त्यात योगाचे श्रे÷ साधन असते. अशा रीतीने संथपणाने अभ्यास चालविला म्हणजे योगाभ्यासाने आणि योगसामर्थ्यामुळे, ध्यानानंतर चित्त स्थिर झाले की, डोळे अर्धोन्मीलित होतात. भेदामधून तत्काळ अभेदामध्ये दृष्टी स्थिर झाली की, इतर पदार्थ न पाहता ती नासाग्री जाऊन दृढ होते. आसनजय, तिन्ही बंधांची प्राप्ती आणि दृष्टीचे स्थैर्य या गोष्टी साधकाला कशा प्राप्त होतात ते मी तुला मी यथार्थ रीतीने सांगतो. प्रथम प्राणाचा मार्ग शुद्ध करावयाचा. पूरक, कुंभक आणि रेचक हेच प्राण आणि अपान वायु शुद्ध करणारे आहेत. जिव्हा आणि लिंग यांच्या स्वैरपणाला आपण पूर्णपणे आळा घालू शकू इतका इंद्रियनिग्रह ज्याच्याकडून होईल, त्यालाच हा प्राणायाम साधेल. इतरांनी कितीही कष्ट केले तरी तो साधावयाचा नाही. प्राणाचे शुद्धीकरण म्हणजे प्राणायाम कसा करतात ते ऐक. पूरक, कुंभक व रेचक करून लगेच रेचक, पूरक व कुंभक करणे अशा दोन्ही प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे. इडेने म्हणजे डाव्या नाकपुडीने प्रथम वायु आत ओढून घ्यावा व तो तसाच राखून ठेवून नंतर तो तिनेच पुन्हा परत सोडावा असाही एक प्रकार आहे.
तसेच उजव्या नाकपुडीने वायु आत घ्यावा आणि तिनेच तो परत सोडावा, असे दुसरेही एक प्राणायामच्या अभ्यासाचे लक्षण ज्ञाते लोक सांगतात. परंतु सर्वास मान्य असे योगाचे लक्षण म्हंटले म्हणजे डाव्या नाकपुडीने वायु आत ओढून घ्यावा, तो कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो उजव्या नाकपुडीने सोडावा किंवा उजव्या नाकपुडीने वायु आत घ्यावा, तोही कुंभकाने थांबवून धरावा आणि मग तो डाव्या नाकपुडीतून सोडावा. त्यामध्ये अदलाबदल करू नये, आणि क्रमात बदल करू नये. कारण हे योगाभ्यासाला अगदी विरुद्ध आहे. कोणताही उतावळेपणा न करिता स्वस्थचित्ताने हळूहळू अभ्यास करावा. ह्यात जर उतावळेपणा केला, तर प्राण मोठय़ा संकटांत पडेल, मग हीही तड नाही आणि तीही तड नाही, अशी साधकांची अवस्था होते.







