वार्ताहर / आष्टा
सांगली-इस्लामपूर रस्त्यावर शिंदे मळ्याजवळ ट्रक आणि ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
ट्रक चालक सचिन भानुदास घाटगे (वय ३८)रा. येरमळकरवाडी ता. मेढा जि.सातारा व लक्ष्मण मारुती औताडे वय ५० रा माळवाडी ता. आटपाडी जि. सांगली अशी अपघातात ठार झालेल्या इसमांची नावे असून या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.
अपघात इतका भीषण होता की ट्रकने दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीचे कमान पाटा व चाके निघून पडली व ट्रक रस्त्याकडेच्या ऊसात गेला छातीला व डोक्याला मार लागल्याने दोघेजण जागीच ठार झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक (क्रमांक एम. एच. ४८ एजी ५४८८)हा सांगलीहून मुंबईला स्टार्च पावडर घेऊन निघाला होता. आष्टा इस्लामपूर मार्गावर शिंदे मळा जवळ हॉटेल सातबारा समोर इस्लामपूर कडून आष्टयाच्या दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक (एम. एच.१० एच. १६१४) च्या मागील दोन ट्रॉल्या एम एच डब्ल्यू७५१८ व ७५१९ पैकी ट्रॉली क्रमांक एम एच १० डब्ल्यू ७५१८ यामागील ट्रॉलीला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॉलीचा चक्काचूर झाला ट्रॉली चे वरचा हौदा एकीकडे चाक एकीकडे व कमान पाटे दुसरीकडे जाऊन पडले व ट्रक रस्त्यावरून उजव्या बाजूला उसाच्या शेतात गेला. यावेळी जोरदार मार लागल्याने चालक सचिन भानुदास घाटगे रा. येरमळकर वाडी व त्याच्या शेजारी बसलेल्या लक्ष्मण मारुती औताडे रा माळवाडी ता आटपाडी हे छातीला व डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले.
आष्टा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधल्यानंतर पहाटे ४ च्या दरम्यान ट्रकमधून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात झाली मृतदेह ट्रक स्टेरिंग मध्ये अडकल्याने ते बाहेर कसे काढायचे हे अवघड आव्हान असताना दीपक डिसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे चार वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत दोघांनाही बाहेर काढले.
तुषार अशोक जाधव यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे करीत आहेत