वार्ताहर / माशेल
कोरोना लॉकडाऊनच्या काळात तिवरे माशेल, खांडोळा व भोम अडकोण पंचायत जनतेला सेवा देणारे तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरविणारे सरकारी कर्मचारी व इतर दात्यांचा आश्रय फाऊंडेशन व कल्चरल असोसिएशनतर्फे सन्मान करण्यात आला. आश्रय फाऊंडेशनचे विनय गावकर, प्रताप वळवईकर व इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.
पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, औषध विक्रेते, दूध विक्रेते, पंचायत सचिव व इतर सेवाभावी संस्थाच्या कार्यकर्त्यांना प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. लॉकडाऊनचा काळात घरात अडकून पडलेल्या अनेक मजुरांबरोबरच गरीबांना कामावर जाता येत नव्हते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बऱयाच जणांकडे पुरेशे पैसेही नव्हते. अशा कठिण परिस्थितीत सापडलेल्या या लोकांना जेवण व इतर जीवनावश्यक वस्तू पुरविणे हे मोठे पुण्यकार्य आहे. शिवाय स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला सेवा देणाऱयांच्या कार्याला तर सलाम करावा लागेल. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून हा छोटासा सन्मान घडवून आणल्याचे विनय गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रताप वळवईकर यांनी लॉकडाऊनच्या काळात जनतेला ज्या लोकांनी सेवा पुरविली ती खऱया अर्थाने समाजसेवा असल्याचे सांगितले. कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे यापुढे अधिक सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. दूध विक्रेते व वृत्तपत्र विक्रेते दिपेश साखरदांडे व पुरुषोत्तम फडते यांनी मनोगत व्यक्त केले.









