स्पर्धा आयोजित करण्यास श्रीलंका उत्सुक, पाकची मान्यता असल्याचा दावा
नवी दिल्ली
आशियाई क्रिकेट कौन्सिलने (एसीसी) यावर्षी होणाऱया आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या भवितव्याचा निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. मात्र श्रीलंकेने त्याचे आयोजन करण्याची ऑफर दिली असून स्पर्धेचे मूळ यजमान पाकिस्तानने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ही स्पर्धा आयोजित करण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व एसीसी यांनी मान्यता दिली असल्याचे लंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा प्रस्तावित असून यावेळी तिचे आयोजन पाकमध्ये होणार आहे. मात्र पाकमध्ये खेळण्यास भारत कधीच जाणार नसल्याने ही स्पर्धा अन्यत्र खेळविणे अटळ बनले आहे. ‘या संदर्भात आम्ही पीसीबीशी चर्चा केली आणि सध्याची जागतिक स्थिती पाहून त्यांनी लंकेत स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे,’ असे सिल्वा यांनी म्हटल्याचे सीलोन टुडेने वृत्त दिले आहे. ‘एसीसीशी देखील आम्ही ऑनलाईन बैठक घेतली आणि ही स्पर्धा आयोजित करण्यास त्यांनीही हिरवा कंदिल दाखविला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
आशिया चषक स्पर्धेबाबत निर्णय घेण्याआधी ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेसंदर्भात आयसीसी कोणता निर्णय घेते, याची एसीसी प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. ‘आशिया चषक टी-20 स्पर्धा आयोजित करणे किती महत्त्वाचे आहे, यावर एसीसी मंडळाने भर दिला आहे. कोरोना महामारीचा आघात आणि त्याचे परिणाम विचारात घेऊन आशिया चषकाच्या संभाव्य केंद्रांच्या पर्यायाबाबत चर्चा करण्यात आली असून लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असे एसीसीने सोमवारच्या बैठकीनंतर प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन पापोन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसीसी कार्यकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीस बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा उपस्थित होते. ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याबाबतही चर्चा झाली. पण लंकेत त्याचे आयोजन करण्यासाठी पर्यायी तारखा उपलब्ध होणार नसल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही, असे एका अधिकाऱयाने सांगितले. 2022 मध्ये चीनमध्ये होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश असून त्यात सहभागी होण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.









