कोरोनाशी सुरू असणारा लढा, लॉकडाऊन काळातील स्थिती आणि कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. विशेषतः 21 दिवसांचा लॉक डाऊनचा काळ संपल्यानंतर काय काळजी घ्यावी लागेल यावर त्यांचा भर होता. कारण भारतीयांची झुंडीची मानसिकता पाहता पूर्वानुभव वाईट आहे. जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर धास्तावलेल्या भारतीय समाजमनाच्या मानसिकतेची एक झलक नुकतीच आपण अनुभवली. 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाल्याक्षणी मजूर, कामगारांचे लोंढेच्या लोंढे बसस्थानक व महामार्गावर आले. 22 मार्चचा जनता कर्फ्यू संपल्यानंतर जिथे असाल तिथे उभे राहून सायंकाळी पाच वाजता घंटानाद अथवा टाळय़ा वाजवून कोरोनाशी लढा देणाऱया सर्व घटकांविषयी आदर व्यक्त करा अशी साधी सूचना पंतप्रधानांनी केली होती. वास्तविक यामागील त्यांचा हेतू स्तुत्य होता. पण अतिउत्साही लोकांनी याचा भलताच अर्थ घेतला. जणू एका दिवसात कोरोना विषाणू देशातून पळाला की आपण पळवून लावला अशा थाटात त्यांनी रस्त्यावर येऊन आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असते. पण लोक जथ्थ्याजथ्थ्याने रस्त्यावर आले. मिरवणुका काढल्या. स्वयंशिस्त आणि सामुदायिक शिस्तीबाबत आपण बेजबाबदार आहोत हे मान्य करावे लागेल. म्हणूनच लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावे, याच्या सविस्तर सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या बैठकीत कराव्या लागल्या. रविवार 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईल टॉर्च लावून देशाच्या सामुदायिक शक्तीचे प्रदर्शन करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. गतवेळी अतिउत्साही नागरिकांनी केलेल्या कृतीची पुनरावृत्ती होऊ नये ही अपेक्षा आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी जगातील दुसऱया क्रमांकाचा गर्दीचा देश मागील दहा दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन केला आहे. एकूण 21 दिवसांचा हा लॉकडाऊन असून, अद्यापही 11 दिवस बाकी आहेत. कोरोनापेक्षा घरात टाईमपास कसा करायचा याच्याशी त्यांची लढाई सुरू आहे. 100 कोटीहून अधिक अस्वस्थ लोकांचा हा थवा आपल्या घरात बंदिस्त अवस्थेत आहे. लॉकडाऊनचा दीर्घकाळ संपल्यानंतर तुंबून राहिलेली ही गर्दी रस्त्यावर कशी वर्तणूक करेल, याचा नेम नाही. आयसोलेशन, क्वारंटाईन, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या एकमेकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याच्या गप्पा या ऍटच टॉयलेट बाथरूमची सुविधा असणाऱयांसाठी ठीक आहेत. पण देशातील बहुसंख्य जनता वन रूम, टू रूम किंवा दहा बाय दहाच्या टीचभर जागेत संसार करते. या टीचभर जागेतही एखादी पडदी टाकून ती स्वतंत्र राहिल्याचा आनंद घेते. 21 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ हा त्यांच्यासाठी वनवासच असेल. 15 एप्रिलनंतर संपूर्ण देश कसा प्रतिसाद देईल याबाबत अनिश्चितता आहे. म्हणूनच लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलला लगेच रस्त्यावर येऊन लोक गर्दी करणार नाहीत, याचे पध्दतशीर नियोजन करावे लागेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यात 100 टक्के तथ्य असून, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. लॉक डाऊन संपले म्हणजे सर्व संपले असे नव्हे, हे पंतप्रधान मोदी वारंवार बजावून सांगत आहेत. मुळातच कोरोनाचा विषाणू आपला विळखा दिवसेंदिवस घट्ट आवळत आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दहा लाखांचा टप्पा ओलांडून गेला असून, 55 हजार मृत्युमुखी पडले आहेत. अजूनही तब्बल 45 हजार रुग्ण मृत्यूच्या दाढेत आहेत. जगावर व देशावर आजपर्यंत कोसळलेल्या संकटांपेक्षा हे महासंकट आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याचा अर्थ हा शत्रू महाभयंकर चिवट आहे. अमेरिकेत आणि स्पेनमध्ये गुरुवारी एका दिवसात एक हजारांहून अधिक मृत्युमुखी पडले. मृतांच्या संख्येत अमेरिकेने चीनला मागे टाकले आहे. इटलीत दहा हजार रूग्ण दगावले आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोरोनाचा फैलाव आपण बऱयापैकी रोखला आहे. केंद्र व राज्य सरकार, जिल्हा व स्थानिक प्रशासन विशेष म्हणजे जनतेदरम्यान चांगल्या पध्दतीचा समन्वय दिसून येत असल्याने समूह संसर्गापासून आपण अद्यापही दूर आहोत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसत असले तरी खऱया अर्थाने आता निर्णायक लढाई सुरू झाली आहे. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रित येऊन कोरोनाशी सामुदायिकरित्या लढा देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. वास्तविक लॉकडाऊनच्या दुसऱया आठवडय़ात या विषाणूला काही मर्यादेपर्यंत रोखण्यात यश आले आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. कोरोना रुग्णांनी 100 चा आकडा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसात वाढीचा दर प्रतिदिनी अंदाजे 18 टक्क्मयांदरम्यान स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील काही दिवसातील आकडय़ांवर दृष्टिक्षेप टाकल्यास इटली, अमेरिका, स्पेन यांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला यश मिळाले आहे. रुग्णांचा शोध, चाचणी, विलगीकरण, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या घेतलेल्या निर्णयाचे हे परिणाम आहेत. आपण वेळीच काही पावले उचलली नसती तर एप्रिल-मे पर्यंत कोरोना रुग्णांचा आलेख नियंत्रणाबहेर गेला असता, हे मान्य करावे लागेल. पण खरे आव्हान असणार आहे ते लॉकडाऊन संपल्यानंतर. कार्यालयातील उपस्थिती टप्प्याटप्प्याने वाढवत न्यावी लागेल. चित्रपटगृहे, रिसॉर्ट, मॉल्स, प्रवासी स्थानके, पर्यटन, धार्मिक स्थळे यासारख्या गर्दीच्या ठिकाणांवर अंकुश हवा.शाळा-कॉलेज परीक्षेपुरती उघडावीत. प्रादुर्भाव असणाऱया ठिकाणांवर करडी नजर हवी. आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदी काही काळासाठी वाढवावी लागेल. अंतर्गत वाहतूक व दळणवळणासाठी योग्य वेळापत्रक करायला हवे. स्वच्छतेला प्राधान्य व त्याची जागृती कायम ठेवावी. कोरोना व्हायरसला पिटाळायचे काम केवळ सरकारचे नसून, यापुढे प्रत्येक नागरिकाने कोरोना विषाणूवर लक्ष केंद्रीत करीत त्याचा पाठलाग करून ते समूळ नष्ट करण्याचा विडा उचलायला हवा. हे आव्हान आपण पेलले तर निश्चितच आपला देश कोरोनामुक्त होईल.
Previous Articleअमेरिकेत कोरोनाचे महाभयंकर संकट
Next Article आर्थिक विकासदर 4 टक्क्मयांवर : एडीबी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








