दिल्लीतील कार्यक्रमात लष्करप्रमुखांचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसस्था
सशस्त्र दलाच्या तिन्ही सेना कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. भारतीय सशस्त्र दल अत्यंत प्रभावीपणे बळकट होत असून त्यांची जगातील सर्वोत्तम दलांमध्ये गणना केली जाते, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले आहे. आपल्या सैनिकांच्या अदम्य धैर्यामुळे आणि बलिदानातून ही ताकद प्राप्त झाल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
नवी दिल्लीत माणेकशॉ सेंटर येथे सातव्या सशस्त्र सेना दिनानिमित्त माजी सैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना लष्करप्रमुखांनी भारतीय सुरक्षा दलाविषयी गौरवोद्गार काढले. माजी सैनिकांच्या योगदानातून प्रेरित होऊन सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवा कोणतीही आव्हाने झेलण्यास सज्ज झाले आहे. तसेच सशस्त्र दलातील माजी सैनिक देशाच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देत आहेत ही अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौदलप्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनीही येथील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित समारंभात लष्करप्रमुखांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच सशस्त्र दलाच्या तिन्ही शाखांमधील माजी सैनिकही मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला एकत्रित आले होते. तसेच विविध माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. 14 जानेवारी रोजी ‘सशस्त्र सेना माजी सैनिक दिन’ साजरा केला जातो. पहिला सशस्त्र सेना माजी सैनिक दिन 14 जानेवारी 2016 रोजी साजरा करण्यात आला. यावषी झुंझुनू, जालंधर, पानागढ, नवी दिल्ली, देहराडून, चेन्नई, चंदीगड, भुवनेश्वर आणि मुंबई अशा नऊ ठिकाणी तीन सेवांच्या मुख्यालयाद्वारे सशस्त्र सेना वेटरन्स डे साजरा केला जात आहे.
नौदल, हवाई दल प्रमुखांचे संबोधन
आजचे सशस्त्र दल हे आपल्या प्रत्येक माजी सैनिकाच्या परिश्रम, दूरदर्शी नेतृत्व, आकांक्षा आणि निःस्वार्थ प्रयत्नांचे फलीत असल्याचे नौदलप्रमुख आपल्या भाषणात म्हणाले. तसेच येथे उपस्थित राहून तुम्हा सर्वांशी संवाद साधणे हा माझ्यासाठी सन्मान असल्याचे ऍडमिरल कुमार म्हणाले. आज देशासाठी जीवन समर्पित करणाऱया आपल्या शूर योद्धय़ांचे स्मरण करण्याचा दिवस असल्याने आपण त्यांना श्रद्धांजली वाहुया, असेही ते म्हणाले. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा समावेश केला असून त्यात महिलांचाही समावेश आहे. हे एक धाडसी, परिवर्तनकारी पाऊल असून नौदलाला भविष्यात अधिक प्रभावशाली बनवण्याच्या दिशेने योगदान प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









