सातारा / प्रतिनिधी :
गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या राजवाडा चौपाटीवरील हातगाडे हा बिकट प्रश्न होता. ती चौपाटी आळूच्या खड्डयात हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. आज दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे यांनी चौपाटीवरील सर्व हातगाडी चालकांची बैठक घेवून, एक गाडी एक मालक कोणावरही अन्याय होणार नाही. जे राहतील त्यांना पर्यायी व्यवस्था करु, असे आश्वासन दिले अन् चौपाटीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
राजवाडा येथील गांधी मैदानावरील रोज भरत असलेल्या चौपाटीबाबत खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरावायची. परंतु ऐतिहासिक अशा राजवाड्याच्या समोर भरत असलेल्या या चौपाटीला इतरत्र हलवण्याबाबत निर्णय पालिकेने घेतला. पर्यायी जागा पाहिली ती आळूच्या खड्डयाची. जागा सपाटीकरण करुन तेथे जागा वाटप करण्याच्यावेळी हॉकर्स धारकांनी थोडासा विरोध केला होता. मूळ चौपाटीवर 76 गाडीवाले होते अन् जागा वाटपात 72 बसतात. त्यावरुन हा प्रश्न सुटत नव्हता. आज खासदार उदयनराजेंनी स्वतः सर्व हॉकर्सना बोलवून घेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले अन् त्यांना ठरल्याप्रमाणे एक हातगाडी मालकास आठ बाय दहाची जागा देण्यात येणार आहे.
तेथे लाईट, पाणी आदी सुविधा दिलेल्या आहेत. उरलेल्या हॉकर्सना अन्यत्र जागा देण्यात येईल, असा तोडगा काढला. या बैठकीवेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









