वार्ताहर / आळसंद
आरोग्य केंद्र गावात व्हावे यासाठी आळसंद (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी गेले 10 वर्ष दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून प्राथमिक आरोग्य आळसंद येतेच होणार असल्याने आळसंद गावासह आसपासच्या 15 गावच्या आरोग्याचा प्रश्न सुटला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे पत्र नुकतेच आळसंद ग्रामपंचायतीस प्राप्त झाले आहे. या निर्णयानंतर आल्याने ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.
आळसंदसह परिसरातील 15 गावच्या नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करून आळसंद येथे सुरू करण्यात यावे अशी मागणी संबधीत ग्रामपंचायतीने केली होती. मात्र, आळसंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत होत असलेल्या दिंरगाईमूळे आळसंद ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच इंदुमती जाधव व उपसरपंच नितीन जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयाने याप्रकरणी आळसंद गावच्या बाजूने निर्णय दिल्याने विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी गावास भेट देऊन पाहणी केली आहे.
आळसंद ग्रामपंचायत तात्पुरत्या स्वरूपात चार खोल्या उपलब्ध करुन देणार असून त्या ठिकाणी विटा प्राथमिक आरोग्य केंद्राकडील बाह्य रुग्ण तपासणी स्त्री रुग्ण तपासणी व प्रसूतीसाठी आळसंद येथील आरोग्य उपकेंद्रातील प्रसूती खोल्या वापरात आणाव्यात तसेच कुंटुब कल्याण शस्त्रक्रियेला आळसंद येते ऑपरशेन थेएटर उपलब्ध होईपर्यंत विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुंटुब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात याव्यात असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिंतेंद्र डुडी यांनी गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र विटा व सरपंच ग्रामपंचायत आळसंद यांना पत्राने कळविण्यात आले आहेत.








