बगदाद
: इराकला मोहम्मद तौफीक आलावी यांच्या रुपात नवा पंतप्रधान मिळाला आहे. इराकचे राष्ट्रपती बरहम सालेह यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. मागील 4 महिन्यांपासून देशात सरकारविरोधी निदर्शने सुरू असून यात सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला आहे.
आलावी यांनी स्वतःच्या नियुक्तीच्या घोषणेनंतर चित्रफित ट्विट करत निदर्शकांना संबेधित केले आहे. निदर्शकांमुळेच हे पद मला मिळाले आहे. तुमचे साहस आणि बलिदानामुळेच देशात हा बदल घडून आला आहे. निदर्शकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास या पदासाठी अपात्र ठरणार असल्याचे अल्लावी यांनी निदर्शकांना उद्देशून म्हटले आहे.
65 वर्षीय आलावी हे माजी पंतप्रधान नूरीअल-मलिकी यांच्या सरकारमध्ये दूरसंचार मंत्री राहिले आहेत. तत्कालीन पंतप्रधानांवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. निदर्शकांच्या मागण्या पूर्ण होईंपर्यंत माघार घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
आलावी यांना नव्या निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्याचे काम पेलावे लागणार आहे. त्यांनी अर्थव्यवस्था सुधारणे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाईचे आश्वासन दिले आहे. नव्या पंतप्रधानांना मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळाला आहे. राजकीय पक्षाने स्वतःच्या उमेदवारांना थोपण्याचा प्रयत्न केल्यास राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.









