ब्लादिमीर पुतीन यांच्या पुढाकारानंतर सहमती : पुढील काळात चर्चा
वृत्तसंस्था / मॉस्को
नार्गोनो-काराबाखमध्ये युद्धविरामावर सहमत झालो आहोत. हा युद्धविराम शनिवार दुपारपासून सुरू होणार असल्याचे आर्मेनिया आणि अजरबैजानने म्हटले आहे. युद्धविरामाचा उद्देश कैद्यांची अदलाबदली करणे तसेच मृतदेह ताब्यात घेणे असल्याचे दोन्ही देशांच्या विदेशमंत्र्यांनी नमूद केले आहे. अन्य बाबींवर पुढील काळात सहमती होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्या विदेशमंत्र्यांमधील ही चर्चा रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या पुढाकारानुसार झाली आहे. दोन्ही देशांच्या संघर्षात किमान 200 जणांना जीव गमवावा लागला आहे. 10 तास चालली चर्चा
युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांच्या देखरेखीत दोन्ही देशांच्या विदेशमंत्र्यांमध्ये 10 तासांपर्यंत चर्चा झाली होती. हा युद्धविराम वाद सोडविण्यासाठी चर्चेचा मार्ग प्रशस्त करणार असल्याचे लावरोव यांनी म्हटले आहे. नार्गोनो-काराबाख क्षेत्रात 27 सप्टेंबर रोजी दोन्ही देशांदरम्यान संघर्ष सुरू झाला होता. हे क्षेत्र अजरबैजान अंतर्गत येत असले तरीही त्यावर स्थानिक आर्मेनियन दलांचे नियंत्रण आहे. या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे.
पहिल्या युद्धात 10 लाख विस्थापित
नागोर्नो-काराबाख सुमारे साडेचार हजार चौरस किलोमीटरच्या कक्षेत फैलावलेला डोंगराळ भाग आहे. या भागात पारंपरिक दृष्टय़ा आर्मेनियन वंशाचे ख्रिश्चन आणि तुर्क वंशाचे मुस्लीम राहतात. हा यापूर्वी सोव्हियत संघाच्या काळात अजरबैजानच्या अंतर्गत एक स्वायत्तशासित भाग होता. आंतरराष्ट्रीय स्वरुपात या भागाला अजरबैजानचाच हिस्सा मानले जाते, परंतु याची बहुसंख्याक लोकसंख्या आर्मेनियन वंशाची आहे. 1988-94 दरम्यान झालेल्या युद्धात सुमारे 10 लाख लोक विस्थापित झाले होते आणि 30 हजार लोक मारले गेले होते. तुर्कस्तानने अजरबैजानाला उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. आर्मेनियात रशियाचा एक सैन्यतळ आहे.









