संग्राम कासले/ मालवण :
कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रात बसला आहे. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. सिने-नाटय़ क्षेत्रालाही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई येथील उदयोन्मुख लेखक रोहन पेडणेकर याच्याकडे तीन महिने कोणतेही काम नसल्याने घरातील चार माणसांचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्याला पडला आहे. परंतु, त्याने कोणाकडेही आर्थिक मदत न मागता, स्वत:चा सुकी मासळी मच्छी विक्रीचा लघुव्यवसाय सुरू केला आहे. रोहनला त्याच्या व्यवसायात त्याचे मित्रही मदत करत आहेत.
रोहन पेडणेकर हा मुंबईत राहतो. त्याने एकांकिका, नाटक, मालिकांमध्ये अभिनय केला आहे. रोहन लेखकही आहे. त्याने एकांकिका, व्यावसायिक नाटकांचे लेखन केले आहे. नाटय़लेखनाबद्दल त्याला विविध पारितोषिके मिळाली आहेत. त्याने स्टार प्रवाहवरील ‘साथ दे तू मला,’ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकांमध्ये अभिनयही केला आहे. परंतु गेल्या तीन महिन्यात पूर्ण सिनेसृष्टी ठप्प आहे. त्यामुळे रोहनला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोहनच्या घरात आई, पत्नी, सहा महिन्यांचे बाळ आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी रोहनला काही तरी करणे आवश्यक होते.
मरण सोपं आहे, जगणं कठीण!
रोहन म्हणाला, कोरोना कालावधीत मरण सोपं आहे परंतु जगणं फार कठीण आहे. आणखी दीड-दोन वर्षे कोरोनाचे सिनेनाटय़सृष्टीवर सावट राहणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जगण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. लोकांनी आर्थिक मदत करावी, अशी माझी अपेक्षा नाही. मला माझ्या स्वत:च्या हिंमतीवर काहीतरी करायचे होते. त्यामुळे मी सुक्या मासळीचा लघुव्यवसाय सुरू केला. व्यवसायात मला माझ्या मित्रांनी सहकार्य केले. दादर ते बोरिवली येथे आम्ही होम डिलिव्हरी करून सुकी मासळी विकतो.
परिस्थितीशी लढा…
रोहन म्हणाला, कोरोना कालावधीत अनेक उदयोन्मुख नाटय़-सिने-कलावंतांवर अशी परिस्थिती आली असेल. परंतु, या परिस्थितीशी लढणे आवश्यक आहे. कठीण काळात मित्र-मैत्रिणींशी संपर्क ठेवा. त्यांच्यासोबत तुमची सुख-दु:ख मांडा. त्यामुळे तुम्ही कोरोना कालावधीत परिस्थितीवर मात करू शकता. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर आपल्याला सर्वांना पुन्हा जिद्दीने सिने-नाटय़सृष्टीत काम करायचे आहे.









