आरोग्यविमा किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणतोच. कोरोना काळात तर आरोग्यविम्याप्रती बरीच जागरूकता निर्माण होते आहे. मात्र आरोग्य विमा डोळे बंद करून घेता येणार नाही. विमा पॉलिसीत आरोग्याशी संबंधित सर्व खर्चांचा समावेश आहे ना, हे पहायला हवं. तुम्हीही विमा पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर खालील बाबी नक्की लक्षात ठेवा.
* प्रत्येक विमा कंपनीचे आरोग्य विम्याबाबतचे नियम, अटी आणि शर्थी असतात. त्यानुसार काही आरोग्यविषयक खर्च वगळले जातात तर काहींचा समावेश केला जातो. त्यामुळे रूग्णवाहिका, औषधं, वैद्यकीय चाचण्या, ओपीडीचा खर्च असे विविध प्रकारचे खर्च समाविष्ट असणार्या आरोग्य विमा पॉलिसीची निवड करा.
* बहुसंख्य विमा कंपन्या पॉलिसी काढण्याआधी असणार्या आजारांसाठीही विमा संरक्षण देतात. मात्र 48 महिन्यांनी म्हणजे जवळपास चार वर्षांनी आर्थिक संरक्षण दिलं जातं. काही कंपन्यांचा कालावधी 36 महिन्यांचा असतो. पॉलिसी घेण्याआधीच तुम्हाला असणार्या आजारांची माहिती कंपनीला द्यावी लागते. यामुळे विम्याचे पैसे मिळवताना अडचणी येत नाहीत.
* या विमा कंपन्यांचे रुग्णालयांसोबत करार असतात. या रुग्णालयांमध्ये उपचार करून घेतल्यास पॉलिसीधारकाला अधिक लाभ तसंच सवलती दिल्या जातात. त्यामुळे कंपनीचा करार असणारी रुग्णालयं तुमच्या घराच्या जवळ आहेत ना, याची खात्री करून मगच पुढे जा. * पॉलिसी घेतल्यानंतर 15 ते 90 दिवसांचा वेटिंग पिरियड असतो. शक्यतो कमी वेटिंग पिरियड असणारी पॉलिसी घेणं योग्य ठरतं.









