वार्ताहर / मालवण:
कांदळगाव रामेश्वर मंदिर मार्गावर आराम बसच्या मागील चाकाखाली सापडून आराम बसचा क्लिनर जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 8.45 च्या सुमारास घडली. मृत क्लिनरचे नाव रमेश दत्ताराम चव्हाण (45, रा. तळेरे वाघाची वाडी) असे आहे.
सकाळी 8.45 च्या सुमारास ही आराम बस मुंबईहून कांदळगाव येथे आली होती. ड्रायव्हर आराम बस पार्किंग करत असताना क्लिनर रमेश चव्हाण हे आराम बसच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. या अपघातात रमेश चव्हाण यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र जायभाय, नाईक यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचानामा केला. पंचनाम्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.
रमेश चव्हाण यांच्या अपघाती निधनाची माहिती समताच नाभिक समाजाचे राज्य उपाध्यक्ष विजय सीताराम चव्हाण, तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, चंद्रकांत चव्हाण, सुनील चव्हाण, अजय चव्हाण, मनोहर चव्हाण, सत्यवान चव्हाण, अशोक भोगले, नीलेश पवार आदी अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले हेते. रमेश चव्हाण हे मुंबई विरार येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. सत्यवान चव्हाण यांचे ते बंधू होत. या अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
बसचालकावर गुन्हा दाखल
हयगयीने वाहन चालवून रमेश दत्ताराम चव्हाण यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आराम बसचा चालक लीलाधर सदाशिव मणचेकर (रा. सागवे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराम बसवर क्लिनर म्हणून कामास असलेले रमेश चव्हाण हे मनमिळावू व परोपकारी वृत्तीचे होते. आराम बसच्या निमित्ताने ते कांदळगावला नेहमी यायचे. त्यांच्या अपघाती निधनाने कांदळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









