कुलगुरुंची पत्रकार परिषदेत माहिती : राज्यपालांची राहणार उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) चा 9 वा वार्षिक पदवीदान समारंभ बुधवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात होणार आहे. बेळगाव, बागलकोट व विजापूर या तीन जिल्हय़ांमधील 38 हजार 411 पदव्युत्तर, पदवी व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण, नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग ऍण्ड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. व्ही. एस. चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यावषी राज्यातील तीन व्यक्तींना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील पं. राजीव तारानाथ, वैद्यकीय व समाजसेवा विभागात डॉ. एच. सुदर्शन बल्लाळ, साहित्य क्षेत्रात डॉ. वादीराज देशपांडे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावषी कला 40, वाणिज्य 8, शिक्षण 11 तर विज्ञान शाखेच्या 27 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. एकूण 86 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकावर आपली छाप उमटविली आहे. 35 हजार 484 विद्यार्थी पदवी, 2 हजार 739 विद्यार्थी पदव्युत्तर, 188 विद्यार्थी डिप्लोमाधारक असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉ. चंद्रकांत वाघमारे, परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार डॉ. वीरनगौडा पाटील, विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. बसवराज पद्मशाली, महसूल अधिकारी डी. एन. पाटील यासह इतर उपस्थित होते.
सुवर्णपदकांवर मुलींची मोहोर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमावर मुलींनी पुन्हा मोहोर उमटवली आहे. गोगटे कॉलेजची विद्यार्थिनी अक्षता भट हिने वाणिज्य विषयात, आरसीयूची विद्यार्थिनी श्वेता गुळण्णावर हिने मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशालॉजी, निपाणी येथील केएलई कॉलेजची विद्यार्थिनी ज्योती सुतार हिने मास्टर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स विषयात सुवर्णपदक मिळविले. जमखंडीतील एका तर बागलकोट येथील दोन विद्यार्थिनींनी सुवर्णपदके मिळविली आहेत.









