60 वाहनांच्या एक कोटीहून अधिक रकमेचा अपहार
वाहनांचे केले रजिस्ट्रेशन, मात्र करच भरला नाही
अधिकारी, कर्मचारी, एजंट संशयाच्या भोवऱयात
दोन वर्षे सुरू होता घोटाळा, तरीही डोळेझाक
एका गुन्हय़ातून उघडकीस आला महाघोटाळा
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत वाहनांचे बनावट रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचा प्रकार दोन महिन्यापूर्वी उघडकीस आल्यानंतर त्या प्रकरणाच्या सखोल तपासात आता वाहन कर घोटाळा उघडकीस आला आहे. महागडय़ा चारचाकी तब्बल 60 वाहनांचा कर न भरताच रजिस्ट्रेशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा घोटाळा जवळपास एक कोटीहून अधिक रकमेचा असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत उघड झाली आहे. त्यामुळे आता आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि एजंट संशयाच्या भोवऱयात सापडले आहेत. वाहन कर घोटाळय़ामुळे शासनाचा एक कोटीहून अधिक कर बुडाला आहे.
जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन रजिस्ट्रेशन व फॅन्सी नंबरचे काम करून देणाऱया खासगी व्यक्तीकडून बनावट रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशनसह फॅन्सी नंबरची रक्कम स्वीकारली गेली. मात्र, ती रक्कम कार्यालयात भरणा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून वाहन मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार ऑगस्ट 2020 मध्ये उघड झाला होता. त्यानंतर वेंगुर्ले -मठ येथील वाहन मालक रोहन बोवलेकर यांच्या तक्रारीनुसार ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघांना झाली होती अटक
या प्रकरणी सावंतवाडी येथील एजंट साईनाथ म्हापसेकर आणि वाहन रजिस्ट्रेशनचे काम देण्यात आलेल्या कंपनीचा प्रतिनिधी सर्जेराव भोवड (रा. गगनबावडा-कोल्हापूर) या दोन संशयितंना अटक करण्यात आली होती. सध्या ते दोघेही जामिनावर मुक्त आहेत. बनावट वाहन रजिस्ट्रेशन करून वाहन चालकांची फसवणूक केल्याचा गुन्हा ओरोस पोलीस ठाण्यात दाखल होताच या गुह्याचा तपास करतानाच उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत वाहन कर घोटाळा उगडकीस आला आहे या मध्ये वाहनाचे रीतसर रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे मात्र वाहनाचा कर मात्र भरलाच गेलेला नाही अशी माहिती उघड झाली
कर न भरलेली वाहने महागडी
वाहनांचे रजिस्ट्रेशन केले. मात्र, वाहन कर भरलाच गेला नसल्याची माहिती तपासात उघड होताच अशाप्रकारे किती वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले. मात्र, वाहन कर भरला गेला नाही, याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घेण्यात आली असता तब्बल 60 वाहनांचा कर न भरताच रजिस्ट्रेशन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ही सर्व 60 वाहने मोठी आणि महागडी असून त्यांची किंमत चार ते पाच लाखाच्या पुढे असून प्रत्येक वाहनाचा कर दोन लाखाहून अधिक आहे त्यामुळे 60 वाहनांचा कर एक कोटींवर जातो. त्यामुळे हा घोटाळा एक कोटीहून अधिक रकमेचा आहे. हा कर न भरल्याने शासन महसूलही बुडाला आहे.
दोन वर्षे होऊनही पत्ता नाही
वाहन रजिस्ट्रेशन संगणक प्रणालीद्वारे केली जाते. तरीही गेल्या दोन वर्षात वाहन कर घोटाळा उघडकीस न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहनांचे बनावट रजिस्ट्रेशन करून फसवणूक झाल्याची तक्रार झाल्यावर अधिक तपासात हा कर घोटाळा उघड झाला आहे.
एजंटच सूत्रधार, तरी नामानिराळेच
2018 ते ऑगस्ट 2020 या या दोन वर्षांच्या कालावधीतील हा घोटाळा आहे. या घोटाळय़ात काही एजंटच खरे सूत्रधार आहेत. मात्र, कागदोपत्री ते कुठेच सापडत नसल्याने नामानिराळे झाले आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत सापडले असून त्यांना हा घोटाळा शेकण्याची चिन्हे आहेत. मात्र, वाहन मालकांनी कराची रक्कम एजंटजवळच दिल्याचे पोलीस तपासात सांगितले गेल्यास एजंट सापडणार आहेत. तसेच हा घोटाळा एक कोटीहून अधिक असल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचारी आणि एजंट यांनी एकमेकांच्या साथीने हा घोटाळा केला असावा, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नेमकी रक्कम कुणाच्या खिशात?
वाहनांचे रजिस्ट्रेशन करताना वाहन मालकांनी वाहन कराची रक्कम संबंधित एजंटजवळ दिली. मात्र, वाहन रजिस्ट्रेशन करताना ती रक्कम प्रत्यक्षात भरलीच नाही. त्यामुळे नेमकी ही रक्कम एजंटनी भरली नाही की अधिकारी आणि कर्मचाऱयांनी ती न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली, हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. वाहन कराची रक्कम भरली गेली नसली तरी वाहनांचे रजिस्ट्रेशन झाल्याची कागदपत्रे दिली. त्यामुळे वाहन मालकांनाही आपली फसवणूक होऊन लाखो रुपये हडप केल्याचे लक्षात आले नाही. मात्र, आता हे वाहन मालकही अडचणीत येणार असून वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द होण्याची शक्यता आहे तसेच ही सर्व वाहने बीएस-4 प्रकारातील आहेत. आता या वाहनांची नोंदणी बंद होऊन बीएस-6 प्रकारातील वाहन नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे या 60 वाहनाची नोंदणी रद्द झाल्यास वाहन मालक अडचणीत येणार असून त्यांची वाहने भंगारात काढण्याची वेळ येणार आहे.
वाहनांचे रजिस्ट्रेशन करूनही वाहन कर न भरता एक कोटीहून जास्त रकमेच्या घोटाळय़ाचा पर्दाफाश होण्यासाठी या घोटाळय़ाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. यात आणखी फसवणूक झाली आहे का? यात कोणाचा हात आहे, याची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता आहे.
वाहन मालकांना नोटिसा, कर वसूल करणार!
वाहन कर घोटाळय़ाची चौकशी सुरू असून प्राथमिक चौकशीत 60 वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले, मात्र कर भरलाच नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कराची रक्कम कोटीच्या घरात जाऊ शकते. या सर्व वाहन चालकांना नोटिसा काढण्यात येणार असून त्यांच्याकडून प्रथम वाहन कर वसूल केला जाणार आहे. तसेच कर भरण्यात फसवणूक केली गेल्यामुळे रजिस्ट्रेशनही रद्द करावे लागणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता स्पष्ट केले. या वाहनांचा कर वसूल करण्यात येईल. मात्र, ही सर्व वाहने बीएस-4 ची आहेत आणि आता बीएस-6 ची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे या वाहनांचे पुन्हा रजिस्ट्रेशन करणेही अशक्य आहे. लवकरच या संपूर्ण प्रकरणाचा तपास होऊन नेमका किती घोटाळा आहे आणि कोण-कोण सहभागी आहेत, ते उघड होईल, असेही त्यांनी सांगितले. संगणक प्रणालीद्वारे वाहन रजिस्ट्रेशन होत असल्याने याबाबत एनआयसी विभागालाही हा घोटाळा कशा पद्धतीने झाला, याचा शोध घेण्यास कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









