उपप्रादेशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राबविली विशेष तपासणी मोहिम
प्रतिनिधी/ गोडोली
जिल्हय़ातून जाणाऱया खाजगी प्रवासी बसेसची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अचानक विशेष तपासणी मोहिम दि. 5 रोजी रात्री सलग 12 तास राबवली. यात सातारा, खंडाळा, आनेवाडी टोलनाका, फलटण येथे विशेष पथकांने केलेल्या तपासणीत तब्बल 98 बसेस कारवाईच्या कचाटय़ात सापडल्या. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांर्तगत कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
सध्या 32 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू असून जिल्हय़ात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रोज एका ब्लॅकस्पॉटवर कार्यक्रम आणि विविध ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम राबविला जात आहे. त्यातच दि. 5 रोजी परिवहन आयुक्तांनी खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम राबविण्याचा आदेश दिले. संपुर्ण राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दुपारी आदेश देत सायंकाळी 5 ते सकाळी 6 असे 12 तासांची विशेष तपासणी मोहिम अचानक राबविण्यात आली. तपासणी मोहिमेत राज्यातील आणि राज्याबाहेरील तब्बल 98 बसेसकडून अटी, नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायदयांर्तगत कारवाई आली.
खंडाळा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, आकाश गालिंदे, जाकिउद्दीन बिराजदार, विशाल घनवट, समीर सावंत, साताऱयात अनिल वैरागडे, आफ्रिन मुलाणी, सुप्रिया गावडे, आनेवाडी टोलनाक्यावर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर चौधरी, धनंजय कुलकर्णी, सुरेश माळी, शरदचंद्र वाडकर तर फलटण येथे संदिप भोसले, मारूतीराव पाटील, प्रशांत पाटील यांनी विशेष तपासणी मोहिमेत कर्तव्यपार पाडेल. अशा पध्दतीची अचानक मोहिम राबवून मोठया प्रमाणावर कारवाई केल्याने खाजगी बसेस वाहतूकदारांना चांगलीच चपराक बसली आहे.यापुढे कधी ही अचानक विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर चौधरी यांनी सांगितले.








