प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाशी संलग्न युपीएल कंपनीमध्ये स्थानिक कर्मचाऱयांना कमी करून अन्य राज्यांतील कर्मचारी भरतीचे सुरू असलेले छुपे प्रयत्न आमदार भास्कर जाधव यांच्यामुळे उधळले गेले. यामुळे या कंपनीत कार्यरत 28 स्पेशालिस्ट कर्मचाऱयांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनीशी संलग्न युपीएल कंपनीच्या माध्यमातून स्थानिक 28 कर्मचारी गेल्या 15-20 वर्षांपासून कार्यरत आहेत. या कर्मचाऱयांना कंपनीने कायमस्वरूपी प्रवेश पास दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे पास कंपनीने ताब्यात घेऊन त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे पास दिले. या कर्मचाऱयांना सुरूवातीला मिळणाऱया सुविधाही कंपनीने हळूहळू कमी केल्या. त्यामुळे कंपनी आता कामावरून कमी करणार, अशी शंका व भीती या कर्मचाऱयांमध्ये निर्माण झाली होती. दुसरीकडे अन्य राज्यातून कर्मचाऱयांची भरती केली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या या कर्मचाऱयांनी आमदार जाधव यांच्याकडे धाव घेतली आणि या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.
त्यानुसार बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार जाधव यांनी कंपनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार गुरूवारी दुपारी ही बैठक कंपनीमध्ये झाली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असिमकुमार सामंता यांच्यासह जॉन फिलीप, एस. एस. बावा, सी. एस. थॉमस, डी. सुरेश, विकास सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जाधव यांनी स्थानिक कर्मचाऱयांच्या प्रश्नावर आक्रमक होत इतकी वर्षे प्रामाणिक काम करणाऱया कर्मचाऱयांना तुम्ही कमी करणार आहात का?, बाहेरून कर्मचारी भरती करून त्यांना लाख-दीड लाख रूपये पगार दिला जातो, मग स्थानिक कर्मचाऱयांचा पगार का वाढवला जात नाही, बोनस देताना भेदभाव का केला जातो?, त्यांना मिळणाऱया सुविधा का कमी केल्या गेल्या, असे अनेक सवाल उपस्थित केले. त्यातच कंपनी महाराष्ट्रात असूनही एकही अधिकारी मराठी का नाही? यावरूनही त्यांनी कंपनी प्रशासनाला जाब विचारला.
आमदार जाधव यांचा रूद्रावतार पाहून व्यवस्थापकीय संचालक सामंत यांनी एकाही स्थानिक कर्मचाऱयाला कमी केले जाणार नाही आणि त्यांचा पगारही कमी केला जाणार नाही, असे आश्वासन दिले. प्रवेश पास बदलण्यात आल्याच्या आणि त्यावर मुदत टाकण्यात आल्याच्या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे कर्मचारी ज्या कंपनीच्या माध्यमातून काम करतात त्या युपीएल कंपनीने उपठेकेदार नेमला आहे. त्याच्याबद्दलही अनेक तक्रारी असल्याचे बैठकीत समोर आले. त्यामुळे भविष्यात या कर्मचाऱयांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांचे अन्य प्रश्न सोडवण्यासाठी आरजीपीपीएल, युपीएल कंपनीच्या अधिकाऱयांसमवेत बैठक आयोजित करण्याची सूचना आमदार जाधव यांनी कंपनी प्रशासनाला केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर, विनायक मुळे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी उपनगराध्यक्ष दीपक कनगुटकर, विनायक जाधव, शिवसेना शहरप्रमुख नीलेश मोरे, सचिन जाधव, राज विखारे उपस्थित होते. बैठकीनंतर कंपनी आवारात जमून सर्व स्थानिक कर्मचाऱयांनी आमदार जाधव यांचे आभार मानले. त्यांनी थेट कंपनीत जाऊन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना या बाबत जाब विचारला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कंपनी प्रशासन नरमले.









