कोटीव्या लाभार्थीशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आयुष्मान भारत योजनेच्या 1 कोटीव्या लाभार्थी पूजा थापा यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. मेघालयाच्या रहिवासी असणाऱया पूजा यांनी आयुष्मान भारत योजना सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. या योजनेमुळे मोफत शस्त्रक्रिया करवून घेणे शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पूजा यांना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करत मोदींनी योजनेबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली आहे.
पंतप्रधानांनी गरिबांच्या मदतीसाठी आयुष्मान भारत योजना लागू करणाऱया डॉक्टर्स, परिचारिका आणि योजनेशी संबंधित कर्मचाऱयांच्या कार्याचे कौतुक केले आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळे आयुष्मान भारत योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना ठरली आहे. याच्या लाभार्थींची संख्या 1 कोटीपर्यंत पोहोचली असून ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. योजनेद्वारे दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत अनेक गरिबांचे जीवन सुधारल्याचे मोदी म्हणाले.
स्थलांतरितांना लाभ
पोर्टेबिलिटीची सुविधा असणे हा योजनेचा सर्वात मोठा लाभ आहे. योजनेशी संलग्न लोक देशात कुठेही स्वस्त आणि उत्तम आरोग्य सुविधा प्राप्त करू शकतात. दुसऱया राज्यात काम करणारे तसेच अन्यत्र स्थलांतर पेलेल्या लोकांना याचा लाभ झाल्याचे मोदी म्हणाले. कोरोना संसर्गामुळे देशाचा दौरा करणे शक्य नसल्याने फोनवरून संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोना चाचणी, उपचार सामील
आयुष्मान भारत योजना गरिबांसाठी सुरू करण्यात आलेली आरोग्य विमा योजना आहे. यात प्रत्येक कुटुंबाला वार्षिक 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा प्राप्त होतो. सरकारने आता योजनेची कक्षा वाढविली आहे. खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये होणारी कोरोना चाचणी देखील आयुष्मान भारत योजनेंतर्गत केली जाणार आहे. योजनेच्या लाभार्थींची कोरोना चाचणी तसेच उपचार मोफत होणार आहेत. या निर्णयामुळे सुमारे 50 कोटी लोकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.









