आणखी 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह : जिल्हाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सहाजणांचा मृत्यू
झाला असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल
51 रुग्णांपैकी 25 रुग्ण बरे होऊन बाहेर आले आहेत. त्यामुळे आयसोलेशन
वॉर्डमध्ये आता 26 रुग्ण उपचाराखाली
आहेत. तसेच आणखी 34 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 12 जणांचे नमुने कोरोना
तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
गेल्या आठवडाभरात आयसोलेशन वॉर्डमध्ये सहाजणांचा तर होम क्वारंटाईन एकाचा अशा सातजणांचा मृत्यू झाला होता. त्यांचे सर्वांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्या सातही जणांचा अन्य आजारामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीदेखील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली होती. परंतु आता आयसोलेशन वॉर्ड मधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रविवारी बरे झालेल्या 25 रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आता या वॉर्डमध्ये 26 रुग्णच उपचाराखाली आहेत.
जिह्यात ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी 35 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आणखी 12 जणांचे नमुने ‘कोरोना’ तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
12 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत
जिल्हय़ात आजमितीला 246 जण विलगीकरणात आहेत. त्यापैकी 149 जणांचे घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले असून 97 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण 274 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यातील 262 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 12 नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 26 रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी एकूण 2168 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
ऍपवर मिळू शकते माहिती
केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘कोरोना’विषयी माहिती व सेवेसाठी स्वस्थ भारत ऍप कार्यान्वित केले आहे. सदरचे ऍप esanjeevaniopd.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येते. या ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचाराविषयी मार्गदर्शन मोफत मिळते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर दक्षता घेणे सोपे जाणार आहे. या ऍपचा जिह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
घरीच विलगीकरण केलेले-149
संस्थात्मक विलगीकरण -97
पाठविण्यात आलेले नमुने-274
अहवाल प्राप्त झालेले नमुने-262
पॉझिटिव्ह आलेले नमुने -1
निगेटिव्ह आलेले नमुने -261
अहवाल प्राप्त न झालेले नमुने-12
विलगीकरण कक्षात दाखल-26
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण-0
आज तपासणी केलेल्या व्यक्ती -2168









