नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे आयोजकांमध्ये चिंता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाची तिसरी लाट यंदा नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता ठळक चर्चेत असताना यामुळे भारतात याच कालावधीत होऊ घातलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेवर टांगती तलवार कायम असणार आहे. कोरोनाचे संकट वेळीच दूर झाले नाही तर ही प्रतिष्ठेची स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत हलवावी लागेल, असे सध्याचे संकेत आहेत. या स्पर्धेच्या भवितव्याबद्दल जूनमध्ये आयोजित आयसीसी बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असा होरा आहे.
सदर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी जवळपास महिन्याभराचा अवधी असेल. मात्र, भारतातील सध्याची स्थिती पाहता, येथे येऊन खेळण्यास एकही आंतरराष्ट्रीय संघ राजी नसेल, ही काळय़ा दगडावरची रेघ मानली जात आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार असून त्यात 16 संघांचा सहभाग अपेक्षित आहे.
तूर्तास, वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील पदाधिकाऱयांनी केंद्रातील धोरणकर्त्यांशी या स्पर्धेबाबत सविस्तर चर्चा केली असून आता फक्त ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत हलवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणे बाकी असणार आहे. देशातील एकूण 9 केंद्रांवर खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
‘आयपीएल स्पर्धा चार आठवडय़ाच्या आतच गुंडाळावी लागली, हे देशात अराजक स्थिती आहे, याचेच संकेत असल्याचे स्पष्ट आहे. देश मागील 70 वर्षातील सर्वात भयंकर प्रकोपाशी लढत असताना अशी वैश्विक स्पर्धा घेणे अर्थातच रास्त ठरत नाही’, असे बीसीसीआयमधील एका पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अलीकडेच कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरच्या आसपास केव्हाही येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली असून त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयमध्ये या स्पर्धेबाबत खल सुरु आहे.
रोज 3 लाखापेक्षा अधिक रुग्ण
मागील काही दिवसांपासून भारतात रोज साधारणपणे 3 लाखापेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित आढळून येत असल्याने आयसीसी देखील आंतरराष्ट्रीय संघातील सदस्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणताही धोका पत्करु इच्छित नाही, असे स्पष्ट संकेत आहेत. भारतातील सध्याची स्थिती पाहता, पुढील किमान 6 महिन्यात कोणताही संघ येथील परिस्थिती पूर्वपदावर येईतोवर दौऱयावर येण्यासाठी अजिबात राजी नसेल. त्यातही 16 संघांनी या स्पर्धेसाठी भारतात येणे तर फक्त दिवास्वप्नच ठरु शकेल, असा मंडळातील काही पदाधिकाऱयांचा होरा आहे.
‘वास्तविक, यंदाची आयपीएल स्पर्धा ही भारतातील वातावरण सुरक्षित आहे, हे अधोरेखित करण्यासाठी उत्तम संधी होती. पण, तीच स्पर्धा केवळ चार आठवडय़ाच्या आतच गुंडाळावी लागली असल्याने एकूण अराजक परिस्थितीची सर्वांना कल्पना आली आहे. त्यामुळे, यापुढे सुरक्षिततेची हमी देणे देखील तोकडे ठरेल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यासारख्या देशांची तरी प्रवास नियमावली देखील असेल. त्यामुळे, भारतात ही स्पर्धा होणे आता निव्वळ कठीण आहे’, असे बीसीसीआयमधील सदर सूत्राने पुढे नमूद केले.
संयुक्त अरब अमिरातीलाच प्राधान्य का?
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्येच हलवण्याचे सर्वात मोठे कारण असे की, संयुक्त अरब अमिरातमध्ये शारजाह, दुबई व अबुधाबी अशी तीन मोठी मैदाने आहेत आणि यातील एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पोहोचण्यासाठी विमान प्रवास करण्याची आवश्यकता नाही. दुसरीकडे, भारतात किमान 6 केंद्रे निश्चित केली तरी यात विमान प्रवास करावा लागेलच आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात, हा प्रवास टाळण्यावर आयोजकांचा भर असणे साहजिक आहे.