सामनावीर बलबर्नीचे शतक, टेक्टरचे अर्धशतक, गोलंदाजांचा भेदक मारा
वृत्तसंस्था/ डब्लिन
येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात यजमान आयर्लंडने 43 धावांनी मात करून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार अँडी बलबर्नीने शानदार शतक झळकवले. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

द.आफ्रिकेकडून फलंदाजी मिळाल्यावर आयर्लंडने 50 षटकांत 5 बाद 290 धावा जमविल्या. त्यात बलबर्नीने 102, हॅरी टेक्टरने 68 चेंडूत 79, जॉर्ज डॉकरेलने 23 चेंडूत 45, अँडी मॅकब्राईनने 30, पॉल स्टर्लिंगने 27 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 48.3 षटकांत 247 धावांत गुंडाळत आयर्लंडने पहिला ऐतिहासिक विजय नोंदवला. याच मैदानावर शुक्रवारी तिसरा व शेवटचा सामना होणार आहे. द.आफ्रिकेच्या डावात सलामीवीर जानेमन मलानने 96 चेंडूत 84 व रासी व्हान डर डय़ुसेनने 70 चेंडूत 49 धावा काढल्या. दोघे झटपट बाद झाले तेव्हा द.आफ्रिकेच्या 160 धावा झाल्या होत्या. पण नंतरच्या फलंदाजांना आयर्लंडच्या अचूक माऱयासमोर अपेक्षित धावगती राखता आली नाही. त्या प्रयत्नात त्यांचा डाव 49 व्या षटकांत संपुष्टात आला. आयर्लंडच्या मार्क अडेयर, जोश लिटल, अँडी मॅकब्राईन यांनी प्रत्येकी 2, डॉकरेल, सिमी सिंग, क्रेग यंग यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः आयर्लंड 50 षटकांत 5 बाद 290 ः अँडी बलबर्नी 117 चेंडूत 10 चौकार, 2 षटकारांसह 102, टेक्टर 68 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 79, डॉकरेल 23 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 45, मॅकब्राईन 30, स्टर्लिंग 27. गोलंदाजी ः फेहलुक्वायो 2-73, केशव महाराज 1-50, तबरेझ शम्सी 1-42, रबाडा 1-58. द.आफ्रिका 48.3 षटकांत सर्व बाद 247 ः मलान 84, डय़ुसेन 49, मिलर 24, अवांतर 17. गोलंदाजी ः अडेयर 2-43, लिटल 2-45, मॅकब्राईन 2-34. यंग 1-34, सिमी सिंग 1-44, डॉकरेल 1-37.









