भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरासाठी अहमदाबाद, धर्मशालेचा पर्याय विचाराधीन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाची आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यास आपले प्राधान्य असेल, असे स्पष्ट संकेत बीसीसीआय कार्यकारिणी बैठकीतून मिळाले आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर भरवण्यासाठी अहमदाबाद, धर्मशालेचे पर्याय विचाराधीन आहेत. भारतात कोव्हिड-19 प्रचंड झपाटय़ाने वाढत असल्याने या प्रतिकूल परिस्थितीत यंदाची आयपीएल भारतात होणार नाही, हे तूर्तास स्पष्ट आहे. सध्या मिळालेल्या संकेतानुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत आयपीएल स्पर्धा खेळवली जाऊ शकते.
कोव्हिड-19 मुळे मार्चपासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असणारे भारतीय क्रिकेटपटू दुबईत प्रशिक्षण सुरु करु शकतात. प्रशिक्षण शिबीर दुबईत सुरु झाले तर आयपीएल दुबईत होण्याचीच ती पूर्वतयारी ठरु शकते. शुक्रवारी याबाबत प्राथमिक चर्चा झाली. आयपीएल कार्यकारिणी बैठकीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
‘कोव्हिड-19 मुळे भारतात सराव सुरु करणे देखील असुरक्षित बनले आहे. त्या तुलनेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्पर्धेच्या तयारीसाठी उत्तम आयोजन केले जाऊ शकते’, असा होरा बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर मांडला. धर्मशाला किंवा अहमदाबादचे (नुतनीकरण केलेले मोटेरा स्टेडियम) पर्याय समोर आहेत. पण, भारतात कोव्हिड-19 झपाटय़ाने वाढत असल्यामुळे संयुक्त अरब अमिरात हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरु शकेल’, असे या सूत्राने पुढे नमूद केले.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातबरोबरच श्रीलंकन क्रिकेट मंडळाने देखील यजमानपदाची तयारी दर्शवली होती. यापैकी संयुक्त अरब अमिरातीत 2014 साली आयपीएलचे काही सामने खेळवले गेले आहेत.
बीसीसीआयचे उद्याच्या आयसीसी बैठकीकडे लक्ष
तूर्तास, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भरवण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंतचा कालावधी नजरेसमोर ठेवला आहे. मात्र, त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या (सोमवार दि. 20) आयसीसी कार्यकारिणीची बैठक महत्त्वपूर्ण ठरु शकेल. या बैठकीत ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकाचे भवितव्य निश्चित केले जाण्याची शक्यता चर्चेत आहे.
सचिव जय शाह यांची उपस्थिती वादाच्या भोवऱयात
शुक्रवारी झालेल्या बीसीसीआय बैठकीत सचिव जय शाह यांची उपस्थिती ठळक चर्चेत राहिली. जय शाह यांचा कार्य कालावधी संपुष्टात आल्याची चर्चा आहे. ‘बीसीसीआय कायदा विभागाने जय शाह यांच्या उपस्थितीला समर्थन दिले. त्यामुळे, ते हजर राहिले’, असे सूत्राने याबाबत बोलताना स्पष्ट केले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची टर्म दि. 27 जुलै रोजी संपते. पण, त्यांच्यासह सचिव जय शाह, संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.









