वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी आगामी आयपीएल स्पर्धा कोणताही अडथळा न येता पार पडेल, असा विश्वास बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.
‘कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय, ही चिंतेचीच बाब आहे. त्यामुळेच बीसीसीआयने काटेकोर पूर्वदक्षता घेतली असून स्पर्धेसाठी केवळ सहाच केंद्रांची निवड केली आणि तेथे बायोबबलही निर्माण केले आहे. तपासणी पथकातील सदस्यांची संख्याही वाढविण्यात आली असून भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांची काळजी घेण्याची सोय करण्यात आली आहे. सर्व उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत असल्याने ही स्पर्धा कोणताही अडथळा न येता पार पडेल, याची खात्री वाटते,’ असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने मुंबईत होणारे आयपीएलचे सामने अन्यत्र हलविण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्व उपाययोजना केल्या असल्याने मुंबईतच सामने खेळविले जातील. पुढे अडचण आल्यास राखीव केंद्रांचीही निवड करण्यात आली आहे, त्याबद्दल त्यावेळी विचार केला जाईल. लखनौ, हैदराबाद व इंदोर ही राखीव केंद्रे आहेत. याशिवाय काही अन्य केंद्रेही ठरविण्यात आली आहेत. पण परिस्थितीनुसार पुढे निर्णय घेतला जाईल, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकूण 10 सामने होणार असून 10 एप्रिल रोजी तेथे दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात पहिला सामना खेळविला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स या संघांचे मुंबई हे बेस ठिकाण आहे. शनिवारी अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी हा धक्का ठरला आहे.









