बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांचे स्पष्टीकरण, टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयाची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘आयपीएल स्पर्धा भारतातच घेणे, हा आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल. याशिवाय, या वर्षातील उर्वरित कालावधीत कोणत्याही टप्प्यावर ही स्पर्धा व्हावी, जेणेकरुन चाहत्यांना आयपीएलचा आनंद लुटता येईल, ही स्पर्धा त्यांना हुकणार नाही, यावर आमचा फोकस असेल’, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्पष्ट केले. सध्या कोव्हिड-19 च्या संकटाने उग्र स्वरुप धारण केले असले तरी ही स्पर्धा भारतातच घेण्यासाठी बीसीसीआय अद्याप प्रयत्नशील आहे, याचे हे संकेत आहेत.
आयपीएल ही जागतिक स्तरावरील सर्व टी-20 लीगमधील सर्वात गर्भश्रीमंत स्पर्धा असून पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे दि. 29 मार्च रोजी या स्पर्धेला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, कोव्हिड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंडळाकडे काहीच पर्याय बाकी राहिला नाही. तूर्तास, ही स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आहे.
‘जनजीवन पूर्वपदावर यावे आणि क्रिकेटला नव्याने सुरुवात व्हावी, ही काळाची गरज आहे. पण, आयसीसीने टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल निर्णय घेतल्यानंतरच आयपीएल आयोजित करण्याबाबत सुस्पष्ट विचार करता येईल’, असे गांगुली यांनी पुढे नमूद केले. यापूर्वीच्या रुपरेषेनुसार, यंदाची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणे अपेक्षित आहे. पण, बाहेरील संघ ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापेक्षाही खुद्द ऑस्ट्रेलियातील स्थिती अतिशय प्रतिकूल आहे. ऑस्ट्रेलियात कोव्हिड-19 चा बराच भडका उडाला असून तेथील अनेक प्रांत लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, आयसीसीला ती स्पर्धा लांबणीवर टाकावी लागेल किंवा रद्द करावी लागेल आणि त्या कालावधीत आपल्याला आयपीएल स्पर्धा आयोजित करता येईल, असा बीसीसीआयचा सध्याचा होरा आहे.
‘2020 मध्ये आयपीएल झालेली नसेल, अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. भारताला आमचे प्रथम प्राधान्य असेल आणि अगदी 35 ते 40 दिवसांचा कालावधी लाभला तरी आमची त्याला हरकत नसेल. पण, हा कालावधी कोणता असू शकेल, याची आम्हाला अद्याप कल्पना नाही. आम्ही सध्या सर्व परिस्थितीचा फेरआढावा घेत आहोत’, असे गांगुली म्हणाले.
आयसीसीच्या निणर्याची प्रतीक्षा
तूर्तास, बीसीसीआय व आयपीएलशी संलग्न सर्व घटक ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत आयसीसी केव्हा निर्णय घेणार, या प्रतिक्षेत आहेत. प्रसारमाध्यमांद्वारे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत बराच ऊहापोह आमच्यापर्यंत पोहोचत आहे. पण, आयसीसीकडून अधिकृत घोषणा झाल्याशिवाय काहीही कल्पना येणार नाही’, याचा गांगुली यांनी पुढे उल्लेख केला.
अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी
नाईलाज असेल तरच विदेशी पर्यायाचा विचार
सध्याच्या घडीला, संयुक्त अरब अमिरात, न्यूझीलंड व श्रीलंकन क्रिकेट मंडळांनी आपल्या देशात आयपीएल स्पर्धा भरवण्याची तयारी दर्शवली आहे. पण, विदेशात स्पर्धा भरवायची असेल तर मंडळाला अतिरिक्त खर्च पेलावा लागेल, ही बाब नजरेसमोर ठेवत स्पर्धा भारतातच घेण्याकडे बीसीसीआयचा कल असेल. कोव्हिड-19 चे अस्मानी संकट थोपले नाही व स्पर्धा भारतात घेणे अगदीच शक्य नसेल तर अशा परिस्थितीत उपलब्ध पर्यायांचा विचार होऊ शकेल, असे सध्याचे संकेत आहेत. चलन विनिमय दर खूप असल्याने विदेशात स्पर्धा भरवण्याचा पर्याय मंडळाच्या दृष्टीने विशेष महागडा ठरणारा आहे.
मंडळासमोर अहमदाबादचा पर्याय विचाराधीन?
आयपीएलमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई प्रँचायझीचे बडे प्रस्थ आहे. त्यामुळे, या ठिकाणी सामने भरवणे आयपीएलसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरेल. पण, यातील बहुतांशी मेट्रो शहरात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढतच असल्याने मंडळासमोरही अनिश्चितता आहे. या ठिकाणी आयपीएलचे सामने होणे शक्य नसेल तर आपण अहमदाबादचा विचार करु, असे संकेत गांगुली यांनी याप्रसंगी दिले. ‘अहमदाबादचे स्टेडियम अव्वल दर्जाचे आहे. आम्ही तेथे जाऊ शकणार का, याची मला कल्पना नाही’, असे गांगुली म्हणाले.









