प्रतिनिधी/ फोंडा
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने फोंडय़ातील आयडी म्हणजेच उपजिल्हा इस्पितळ कारोना रुग्णांसाठी पुन्हा एकदा खाली करण्याच्या हालचाली सुरु आहेत. शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कारोना रुग्णांसाठी खाली करण्याचा आदेश निघाला असून फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळही कोणत्याही क्षणी खाली करावे लागणार आहे.
उपजिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करण्यापूर्वी इतर रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील व त्यांची परवड होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी, अशी मागणी मगो रायझींग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केली आहे.
मागच्यावेळी रुग्णांचे प्रचंड हाल
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आयडी इस्पितळ कोरोना रुग्णांसाठी खाली केल्यानंतर बराच काळ फोंडय़ातील रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. ज्या फर्मागुडी येथील दिलासा इस्पितळात पर्यायी सोय करण्यात आली होती, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना छोटय़ा मोठय़ा उपचारांसाठी बांबोळी येथील गोमॅकोत पाठवावे लागले. हृदयविकाराचा झटका आलेल्या व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना आपत्कालीन वेळी जवळपास वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही. महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही मागच्यावेळी वाईट अनुभव आला. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी पुन्हा एकदा इस्पितळ खाली करणार, या वृत्ताने फोंडय़ातील नागरिकांनी धसका घेतला आहे.
फोंडय़ाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे इस्पितळ म्हणजे येथील लोकांची जीवन वाहिनी आहे. फोंडय़ातील शहरी भागाबरोबरच माशेल, बाणस्तारी, शिरोडा, मडकई, उसगांव, खांडेपार, बेतोडा, निरंकाल, दुर्भाट, आगापूर, सावईवेरे, केरी आदी विविध भागातील सर्वसामान्य रुग्ण या इस्पितळावर अवलंबून आहेत. शेजारील धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा, मोले, कुळे या भागातूनही अनेक रुग्ण उपचारासाठी याठिकाणी येतात. येथील ओपीडीमध्ये दिवसाकाठी किमान 500 रुग्णांची नोंद होते. याशिवाय गरोदर महिला व प्रसुतीसाठी येणाऱया महिलांची संख्याही मोठी आहे. डोळय़ावरील शस्त्रक्रीया व अन्य छोटय़ामोठय़ा शस्त्रक्रीयाही याठिकाणी केल्या जातात. मुत्रपिंडाने बाधीत असलेल्या रुग्णांवर डायलेसीस केले जाते. या सर्व रुग्णांची पर्यायी जागेत चोख व्यवस्था करावी लागणार आहे.
यापूर्वी कोराना रुग्णांसाठी उपजिल्हा इस्पितळ खाली करताना फोंडय़ातील रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेला रक्तसाठा विभाग, एमआरआय, सिटीस्कॅन सारखी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अद्याप या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. छोटय़ामोठय़ा उपचारांसाठी उपजिल्हा इस्पितळात येणाऱया सामान्य रुग्णांना बांबोळीत पाठवायचे झाल्यास त्यांना बसची व्यवस्था करा, अशी मागणीही डॉ. भाटीकर यांनी केली आहे.
सरकारला पुन्हा दिलासा मिळणार काय ?
गेल्या वर्षी फर्मागुडीच्या ज्या दिलासा इस्पितळात उपजिल्हा इस्पितळाची पर्यायी सोय केली होती, त्या दिलासाचे लाखो रुपयांचे भाडे सरकारने अद्याप फेडलेले नाही. त्यामुळे पुन्हा आयडी इस्पितळ खाली करताना सरकारला ही जागा उपलब्ध न झाल्यास दुसरी जागा रुग्णांना सोयिची ठरेल व सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे, असे डॉ. भाटीकर यांनी सांगितले.









