150 ते 200 हल्लेखोर सक्रिय : ‘युएन’चा इशारा
संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था
केरळ आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये आयएस या दहशतवादी संघटनेने मोठे जाळे तयार केले आहे. या दोन्ही राज्यात तब्बल दीडशे ते दोनशे दहशतवादी सक्रिय असून त्यांच्याकडून कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेनेही व्याप्ती वाढवली असून त्यांच्याकडून भारतात हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा आपले बस्तान बसविण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षित केले जात आहे. विविध देशांमध्ये वेगवेगळय़ा नावांनी दहशतवादी संघटना सक्रिय होत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. ओसामा महमूद या म्होरक्याकडून हे जाळे मजबूत करण्यात येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.









