आशा कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना काळात आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार प्रत्येकाच्या घरी जावून आम्ही काम केले आहे. रात्रंदिवस काम केले असताना आमच्या समस्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. तातडीने आमच्या समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी जिह्यातील आशा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
किमान 12 हजार मासिक वेतन, वेळेत प्रोत्साहन धन, कोरोना काळात काम करण्यासाठी सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड या वस्तू द्याव्यात. जवळपास आम्ही 42 हजार कार्यकर्त्या काम करत आहोत. राज्यात या सर्व महिला आरोग्य विभागाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
गेली 10 ते 11 वर्षे शहर तसेच ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही काम करत आहे. विविध सरकारी योजनांची जनजागृती, याचबरोबर महिलांना पौष्टिक आहार, औषधेदेखील देत आहोत. कोरोना काळात आम्हाला पॅकेज दिले नाही. काही जणांनाच ती रक्कम मिळाली आहे तर काही जणांना ती रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंब चालविणे अशक्मय झाले आहे. तेव्हा आमच्या कामाचा विचार करून आम्हाला वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण जडगण्णावर, गीता रायगोळ, रूपा अंगडी, भारती माशाळ, सुजाता कारमठ, जयश्री साळवी, लता जाधव यांच्यासह आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









