ऑनलाईन टीम / नैरोबी :
आफ्रिका खंड पोलिओमुक्त झाल्याची घोषणा आफ्रिका रिजनल सर्टिफिकेशन कमिशनने केली आहे.
आफ्रिका खंडातील केवळ नायजेरियात पोलिओचे रुग्ण होते. वाइल्ड पोलिओचे शेवटचे प्रकरण चार वर्षांपूर्वी नायजेरियात आले होते. आता हा देशही पोलिओमुक्त झाला आहे. आफ्रिकेतील विविध देशांचे सरकार आणि त्यांच्या आरोग्य संघटना, आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे 18 लाख बालकांना पोलिओपासून वाचविण्यात यश आले आहे.
जगात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोनच देशात पोलिओचे रुग्ण आढळतात. पोलिओला उपचार नसल्याने लसीकरण हाच पर्याय आहे. पाच वर्षापर्यंत मुलांना लस दिली नाही तर पोलिओचा धोका असतो. त्यामुळे पोलिओला अटकाव करण्यासाठी या देशात लशीकरण मोहीम सुरू आहे.









