आपचे दिल्लीचे आमदार राघव चड्डा यांचा दावा
प्रज्ञा मणेरीकर/ पणजी
आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठे बहुमत मिळणार आहे, याशिवाय आम आदमी पक्षाचा एकही आमदार फुटून दुसऱया पक्षात जाणार नाही याची खात्री मी देतो. याचबरोबर येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीतही जास्त जागांवर आपचे उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास आम आदमी पक्षाचे दिल्लीचे आमदार राघव चड्डा यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केला.
वीज आंदोलनाच्या सभा धुडकावून लावण्यासाठी गोव्यात पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. अटक करून खोटे गुन्हे दाखल करणाऱयांना आम आदमी पक्ष घाबरत नाही. जानेवारीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या मतदारसंघात म्हणजेच वाळपईत पहिल्या वीज आंदोलन सभेला संबोधित करणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी. आम्ही अशा दबावांना घाबरत नाही, असेही ते म्हणाले.
आप सरकराचा गोव्याला फायदा होणार
दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार येण्यापूर्वी दहा दहा तास वीज गायब असायची. कमी वीज आणि बिल जास्त अशी परिस्थिती होती. परंतु आता केजरीवाल सरकार आल्यानंतर पाणी, वीज हे अखंडित मिळते. वीज तर मोफत मिळते. केजरीवाल मॉडेल ऑफ इलेक्ट्रीसिटी गोव्यात लागू करायचे आहे. गोमंतकीयांना वचन दिले आहे की गोव्यात आपचे सरकार आल्यावर 48 तासाच्या आत गोमंतकीयांना 200 युनिट मोफत वीज देणार आणि 400 युनिट विजेचा दर अर्धा करणार. 73 टक्के गोमंतकीयांना 200 युनिट वीज मिळत असल्यास त्यांचे वीज बील शून्य येणार आहे. उर्वरित 20 टक्के गोमंतकीय 400 युनिट वीज वापरत असतील तर त्यांच्या विजेचे बील अर्धे होईल. यामुळे बहुतांश गोमंतकीयांना केजरीवाल मॉडेल ऑफ इलेक्ट्रीसिटीचा फायदा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रामाणिक सरकार फक्त आप देऊ शकते
आम्हाला मोठय़ा प्रमाणात समर्थन मिळत असल्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्रास होत असून सभा धुडकावून लावण्यासाठी पोलिसांचा गैरवापर करत आहेत. विविध माध्यमातून 2 लाख 62 हजार लोकांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. हेच आमच्यासाठी मोठे यश आहे. यावरूनच गोमंतकीयांना 24 तास वीज आणि स्वस्तात हवी आहे. परंतु राज्य सरकार गोमंतकीयांना ती देत नाही. सरकार गोमंतकीयांच्या भल्यासाठी कार्य न करता आपल्या स्वार्थासाठी कार्य करत आहे. यामुळे गोमंतकीयांना प्रामाणिक सरकार हवे आहे जे आम आदमी पक्ष देऊ शकते असा विश्वास चड्डा यांनी व्यक्त केला.
येत्या निवडणुकीत अन्य पक्षांना काहीच महत्व नाही
येणारी विधानसभा निवडणूक भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातच होणार आहे. इतर पक्षांना त्यात काहीच महत्त्व नाही. या पक्षांचे एक उमेदवार पक्षाच्या तिकिटावर निवडून येतो आणि मग दुसऱया पक्षात प्रवेश करतो. त्यानंतर तिसऱया पक्षात पोहोचतो आणि पुढील निवडणुकीच्या वेळेस पुन्हा मूळ पक्षात प्रवेश करतो. हा राजकीय अप्रामाणिकपणा गोव्यात अनेक वर्षे सुरू असून लोकांना याचा कंटाळा आला आहे. गोमंतकीय हे चांगले आणि प्रामाणिक लोक आहेत. प्रत्येक पक्षाने गोमंतकीयांशी विश्वासघात केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या पक्षांना काहीच महत्व राहिलेले नाही, असा दावाही चड्डा यांनी केला.
भाजपला सडेतोड उत्तर द्यायची तयारी
निवडणूक जिंकून येण्याची चिन्हे आम आदमी पक्षाशिवाय इतर कुठल्याच पक्षाकडे दिसून येत नाहीत. त्यामुळे कुणीच आपली मते खराब करण्यासाठी पाहत नाहीत. याशिवाय गोव्यात विरोधकच नाहीत. ती पोकळी आपने भरून काढली आहे. काँग्रेस सध्या संदर्भहीन बनला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला सडेतोड उत्तर देऊन निवडणूक जिंकण्याची तयारी आम आदमी पक्ष करत आहे, असे चड्डा यांनी सांगितले.
गोम्स यांचे आरोप तथ्यहीन, चुकीचे
एल्वीस गोम्स आणि इतर कार्यकर्त्यांनी पक्षासाठी कार्य केले. त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. याशिवाय त्यांच्या भविष्यासाठीही शुभेच्छा आहेत. त्यांनी आमच्यासाठी कार्य केले परंतु आम्ही त्यांच्याविरोधात काहीच विधान केलेले नाही. परंतु आता गोम्स आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत, असे स्पष्टीकरण राघव चड्डा यांनी यावेळी दिले.









