कोरोनाच्या दुसऱया लाटेने संपूर्ण देशभर भय, निराशा, हतबलता, नकारात्मकतेचे मळभ दाटलेले असतानाच भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला मोसमी पावसाचा पहिला दीर्घकालीन अंदाज म्हणजे ‘आनंदवारे’च म्हणायला हवेत. नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मोसमी पाऊस भारतासारख्या देशासाठी जीवनदायी मानला जातो. सलग तिसऱया वषी ही आभाळमाया कायम राहण्याचे संकेत असून, देशात सरासरीच्या 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. यात सरासरी इतक्मया 40 टक्के, अतिरिक्त 5 टक्के व सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्मयता 16 टक्के इतकी गृहीत धरण्यात आली आहे. तर सरासरीपेक्षा कमी 25 व अवर्षणाची शक्मयता 14 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. शिवाय मोसमी पावसावर परिणाम करणारा एल निनो हा घटकही हंगामाच्या सुरुवातीला तटस्थ स्थितीत राहणार असल्याकडे या हवामानविषयक अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे चांगल्या व पोषक पाऊसमानाबरोबरच दुष्काळाच्या दुष्टचक्रापासूनही दूर राहता येईल, या आशा बळावतात. विभागनिहाय अंदाजातूनही नेमकी पावसाची स्थिती कशी राहील, यावर प्रकाश टाकलेला दिसतो. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक हा पट्टा पाऊसपाणी व शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानतात. या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अदमास असाच सुखकारक होय. तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश या भागातही पाऊस चांगला राहील, अशी अटकळ आहे. वरुणराजाने ही कृपादृष्टी ठेवली, तर या राज्यांसह अवघा देश सुजलाम सुफलाम होईल, हे नक्की. स्कायमेट ही खासगी संस्थाही मागच्या काही वर्षांपासून हवामानविषयक अंदाज देते. यंदाचा मोसमी पावसाचा हंगाम अर्थात जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरचा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. हीदेखील दिलासादायक बाब ठरावी. भारतासारख्या कृषिप्रधान देशाकरिता पाऊस हा प्राणवायूचे काम करतो. या पावसावरच शेती, मातीचे भरण पोषण होते. पीकपाणी चांगले राहिले, तर लाखांचा पोशिंदा असलेला बळीराजा तगतो. शेतमालाला चांगला भाव मिळाला, तर त्याचे आयुष्य अधिक सुसह्य होते. तशी मागची दोन वर्षे पावसाच्या दृष्टीने अनुकूल राहिली आहेत. तरीदेखील अतिवृष्टीने काही भागात हानी झाली व शेतकऱयाला नुकसान सोसावे लागलेच. या वषी समाधानकारक पाऊस व्हावा नि हे सारे टळावे, हीच सर्वांची अपेक्षा अपेक्षा असणार. लहरीपणा हे मोसमी पावसाचे वैशिष्टय़. हा लहरीपणा कधी कधी जास्तच टोकाला जातो नि पुढची सगळी गणिते कोलमडतात. याचा अनुभव महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील शेतकऱयांनी अनेकवेळा घेतला आहे. अनेकदा लवकर आगमन होऊन नंतर पावसाने पाठ फिरवल्याचीही उदाहरणे आहेत. यातून दुबार, तिबार पेरणीच्या संकटाला शेतकऱयाला सामोरे जावे लागते. हे संकट अधिक गडद होणे म्हणजे दुष्काळ झळा होत. त्याचे चटके सोसत व मोडूनही पुन्हा उभे राहत भारतीय शेतकऱयांनी वेळोवेळी आपले धैर्य दाखवून दिले आहे. तसा शेती हा आतबट्टय़ाचा वा अत्यंत बेभरवशी व्यवसाय मानला जातो. शेतधंद्यातील अस्थैर्यामुळेच अनेकांनी याला रामराम ठोकला आहे. तथापि, याच अशाश्वत मानल्या जाणाऱया शेतीने आपल्या कोविड महामारीत तारले, हे कसे विसरता येईल? चालू वषीही शेतीवर आणि शेतकऱयावर आपली मदार असेल. किंबहुना, आतापासूनच शेतीचे योग्य नियोजनही करावे लागेल. अतिवृष्टीसारखे संकट आले तर त्याला कसे सामोरे जायचे याचाही विचार केला पाहिजे. त्याचबरोबर पावसातील चढ उतार, खंड वा बदलते निसर्गचक्र अशा अनेकविध घटकांचा विचार करून नुकसान कसे टाळता येईल, पीक पद्धतीत काही बदल करावा लागेल काय, याबाबतची दिशाही निश्चित केली पाहिजे. त्यादृष्टीने तज्ञ मंडळींचे मार्गदर्शनही उपयुक्त ठरेल. ज्या कृषी अर्थव्यवस्थेने कठीण समयी देशाला साथ दिली, देशवासियांचे पोषण करतानाच नवी उमेद जागविली, त्या क्षेत्राला व त्याचा मूलाधार असलेल्या बळीराजाला उभारी देण्यासाठी सरकारनेही सदैव तत्पर रहावे. आज खाद्य तेल आपल्याला मोठय़ा प्रमाणात आयात करावे लागते. त्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. म्हणूनच तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारने शेतकरी बांधवांना प्रोत्साहन दिले तर हा भार नक्कीच कमी होईल. पाणीसाठा हाही अतिशय मोलाचा विषय. एप्रिल, मेमध्येच अनेक शहरांना, नगरांना टंचाईची झळ बसते. धरणातील जलसाठा तळाला जातो. पाण्याचा प्रत्येक थेंब कसा साठविता वा जमिनीत जिरविता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. अनिर्बंध उपसा व काँक्रीटीकरणाने शहरांचा पाणीप्रश्न बिकट बनतो आहे. लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागल्याचे उदाहरण ताजे आहे. आणखी महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे पावसाळी नियोजन. अलीकडे 15 ते 20 मिमी पावसातच शहरे पाण्याखाली जाऊन तेथील व्यवस्थेचा बोऱया वाजतो. त्यामुळे प्रशासनाने वेगाने पाऊसपूर्व कामे तडीस न्यावीत. औद्योगिकीकरण, अर्थव्यवस्था यांच्यावरही हा पाऊस दूरगामी परिणाम करीत असतो. पाऊसपाणी चांगले राहिले तरच सुगी येणार हा निसर्गनियम. पाणी म्हणजे जीवन. त्या अर्थी सगळय़ाच क्षेत्रासाठी तो संजीवक. आज सगळा देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. यात लाखमोलाची माणसे गेली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. नोकऱया गेल्या. अशा या मलूल वातावरणात मोसमी वारे आनंद वारे म्हणून यावेत. या वाऱयांनी येथील नूर पालटावा. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध सर्वत्र पसरावा, त्याने प्रत्येकात आत्मबळ संचारावे, शेत-पिके वाऱयासवे डोलावीत, नद्या खळखळून वहाव्यात, पक्षी, प्राणी बागडावेत नि सर्वत्र आनंद भरून रहावा…सकळांस संजीवनी मिळावी…समृद्धीचे प्रतीक असलेला वरुणराजा निराशेत आशेचे इंद्रधनू पेरत नव्या दिवसांची ही चाहूल निश्चित देईल, अशी आस आहे. ती फलद्रूप व्हावी, हीच सदिच्छा.
Previous Articleभावना आणि बुद्धी
Next Article हेवीवेटस् मुंबई-दिल्ली आज आमनेसामने
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








