भातशेती भरपाईवरून आरोप : 7 रोजी बैठक घेणार-सभापती
वार्ताहर / सावंतवाडी:
एक तर शासन तुटपुंजी रक्कम देते अन् ही भातशेतीची नुकसानी शेतकऱयांच्या हाती द्यायला दोन वर्षे का लागतात? सावंतवाडी महसूल विभाग वशिलेबाजीने काही गावातच भरपाई देते. काहींना का डावलते? भातशेती नुकसानभरपाईत घोळ आहे, असा आरोप माजी सभापती रवींद्र मडगावकर, संदीप गावडे, श्रीकृष्ण सावंत, मनीषा गोवेकर, प्राजक्ता केळुसकर, पंकज पेडणेकर यांच्यासह सदस्यांनी केला.
सभापती धुरी यांनी सांगितले, 7 सप्टेंबरला कृषी अधिकारी व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासमवेत बैठक घेऊन वस्तुस्थिती पाहून व ज्या भागातील शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत, त्यांना भरपाई मिळवून देण्यास भाग पाडू,
सावंतवाडी पं. स. मासिक बैठक झूम ऍपवर ऑनलाईन शुक्रवारी सभापती धुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, पं. स. सदस्य रवींद्र मडगावकर, पंकज पेडणेकर, संदीप गावडे, मोहन चव्हाण, प्राजक्ता केळुसकर, अक्षया खडपे, श्रीकृष्ण सावंत, सुनंदा राऊळ, रेश्मा नाईक, मनीषा गोवेकर, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, दत्ता गायकवाड, कल्पना बोडके उपस्थित होत्या.
भातशेती नुकसानीवर खडाजंगी
वर्षभरापूर्वी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्यात आले. मात्र, भरपाईच्या यादीनुसार भरपाई गणेशचतुर्थी कालावधीपर्यंत पोहोचत नव्हती. सांगेली पंचक्रोशीतील शेतकऱयांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे महसूल विभागात वशिलेबाजी चालते का, असा सवाल मडगावकर यांनी केला. त्यावर गावडे यांनी या भागात 14 लाखाची भरपाई
प्रलंबित आहे. ती का दिली नाही, असा सवाल केला. सावंत, गोवेकर, केळुसकर, चव्हाण यांनीही हा मुद्दा उचलून धरला.
भात, नाचणी पीकविमा कालावधी वाढवा!
मडगावकर म्हणाले, भात व नाचणी पीक विमा योजना प्रस्तावाची तारीख 15 ऑगस्ट होती. ती वाढली पाहिजे, असे सांगितले. शीतल राऊळ यांनी एकमेव बांदा ग्रामपंचायतीने पीकविमा स्वत: उतरविला आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.
फौजदारी दाखल करू!
श्रीकृष्ण सावंत यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेबाबत अधिकारी काहीच करू शकत नाहीत. या अधिकाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल करू. हे पूर्वीची कामे वेळेत करू शकत नाहीत. ते आता काय करणार, असा सवाल केला. आजच्या बैठकीत मोहन चव्हाण यांनी चौकुळ दलितवस्ती रस्त्याचे काय झाल। असा सवाल केला. तर सुनंदा राऊळ यांनी सांगेली जायपीवाडा बंधारा, विहिरीचे काय झाले, असा मुद्दा उपस्थित केला.
प्रत्येक सदस्याने लाखाची कामे सूचवावीत!
सभापती धुरी यांनी यंदा पाणी स्वच्छतेसाठी दीड लाखाची व अन्य विकासकामे प्रत्येकी पं. स. सदस्यांनी दीड लाखाची मिळून तीन लाखाची कामे सूचवावीत, असे स्पष्ट केले. पंतप्रधान ग्रामसडक कामांबाबत सोमवार 7 सप्टेंबरला बैठक घेणार आहोत, असे स्पष्ट केले.
श्रीकृष्ण सावंत यांनी माजगाव मागासवर्गीय वस्तीतील पुलाचे काय झाले? साकव दाखवून फसवणूक केली असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.
पं. स. सभागृह बरखास्त करा
श्रीकृष्ण सावंत व मनीषा गोवेकर या भाजप व काँग्रेस सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर आक्षेप घेतला. गेली तीन वर्षे सदस्यांच्या मागणीकडे अधिकारी कानाडोळा करतात. जर ते पं. स. सदस्यांच्या समस्या मार्गी लावत नसतील तर सभागृह हवेच कशाला? ते बरखास्त करा, असे स्पष्ट केले. तळवडे-सावंतवाडी सकाळी नऊची एसटी बस सुरू करा, अशी मागणी पंकज पेडणेकर यांनी केली. कास-शेर्ले येथील कोविड सेंटरमध्ये सुविधा, व्हेंटिलेटर द्या, अशी मागणी मडगावकर यांनी केली.
दूरसंचारला झालेय काय?
दूरसंचारचेचे गावागावातील टेलिफोन, इंटरनेट सेवा बंद आहे. सर्व ऑनलाईन कामकाज असताना दूरसंचारची सेवा बंदच आहे. ती सुरळीत करा, असे मडगावकर यांनी सूचित केले. गटविकास अधिकारी नाईक यांनी गावात बाहेरून कोणी आले तर 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असल्याचे स्पष्ट पेले.
कोविड सेंटरला सुविधा द्या!
शीतल राऊळ म्हणाले, कोविडसाठी राज्याकडे 550 कोटी जमा आहेत. त्यापैकी 132 कोटी खर्च झाले. मग सिंधुदुर्गसाठी पाच कोटी तरी खर्च करा. कोविड सेंटरसाठी व्हेंटिलेटरची सोय करा. व्हॅन आणा, असे स्पष्ट केले.









