प्रतिनिधी/ निपाणी
कोरोना महामारीमुळे आर्थिक फटका बसलेल्या देशातील जनतेला आत्मनिर्भर अंतर्गत 20 लाख कोटींचे विशेष पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. त्यामध्ये राज्याच्या वाटय़ाच्या रकमेपैकी आतापर्यंत 4600 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. ग्रामस्वराज्य व रामराज्य डोळय़ासमोर ठेवून पेंद्र व राज्य सरकारची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी केले.
निपाणीत शनिवारी विविध खात्यांतर्गत उभारण्यात आलेल्या सर्किट हाऊस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व वाणिज्य कर कार्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री कार्जोळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले, पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्जोळ पुढे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी आपण निपाणीत आलो होतो. तेव्हा निपाणीतील रस्त्यांची असलेली अवस्था व आता झालेला विकास पाहून आश्चर्य वाटले. जोल्ले दाम्पत्याने विकासात आदर्शवत कामगिरी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम व समाजकल्याण खात्याचा मंत्री या नात्याने बेळगाव जिल्हय़ात विकासकामांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी दिला आहे. राज्य महामार्ग विकास प्रकल्प व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत जिल्हय़ात रस्ते व पूलनिर्मिती तसेच दुरुस्ती कामे सुरू आहेत. समाज कल्याण खात्यांतर्गत जिल्हय़ात 95 कोटींच्या निधीतून 541 आंबेडकर भवनांची निर्मिती झाली आहे. विद्यार्थी वसतीगृहे व दर्जेदार शिक्षणातून कर्नाटकाने देशात क्रांती केली आहे.
गेल्यावर्षी महापुरामुळे राज्याचे 35 हजार कोटींचे नुकसान झाले. कोरोना महामारीमुळेही राज्याला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने रिक्षाचालक, चर्मकार, विणकर, नाभिक, चालक यांच्यासह शेतकरी, छोटे व्यावसायिक व विविध घटकांना मदतीचा हात दिल्याचे सांगितले.
परिवहन खात्यास 2652 कोटींचे नुकसान
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, कोरोना महामारीने परिवहन खात्यास 2652 कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. अशा स्थितीतही परिवहन कर्मचाऱयांचे वेतन थकवलेले नाही. तसेच सक्तीच्या रजेवर कोणाला पाठविण्याचा प्रस्तावही नसल्याचे त्यांनी सांगितले. मंत्र्यांकडून कामे कशी करून घ्यायची हे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. निपाणी मतदारसंघातील कोणतेही काम थांबणार नाही, याची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
हायटेक आगार निर्मितीसाठी प्रयत्नशील
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी जनतेने दिल्यानंतर जबाबदारीची जाणीव ठेवून विकासकामे राबवत आहोत. हायटेक बसस्थानक निर्मितीनंतर हायटेक आगार निर्मितीसाठी एपीएमसीकडे 5 एकर जागेचा प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच येथे हायटेक आगार व जनावरांचा सुसज्ज असा दवाखाना उभारणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी येथे रिंगरोड व कोर्ट कॉम्प्लेक्ससाठी निधी देण्याच्या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांना दिले. याप्रसंगी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेर्ली, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह मान्यवर, विविध खात्याचे अधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री अनुपस्थित
दरम्यान निपाणीत दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत असताना पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे मात्र यावेळी अनुपस्थित होते. याचीही चर्चा सुरू होती. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना निमंत्रण दिले होते. मात्र ते बेंगळूरमध्ये असल्याने उपस्थित राहिले नसल्याचे उत्तर देण्यात आले.









