‘माझ्यावर तेथे कोणतेही दडपण नव्हते. मी ऑलिम्पिकमध्येही अन्य इव्हेंटप्रमाणेच भाग घेतला. येथे फायनलमध्ये धडकलेल्या प्रत्येक ऍथलिटविरुद्ध खेळलेलो असल्याने चिंतेचे कारण नव्हते. मी माझ्या परफॉर्मन्सवर फोकस करु शकलो आणि सुवर्ण जिंकण्यासाठी हेच महत्त्वाचे ठरले. अर्थात, हा आणखी एक माईलस्टोन आहे. यापुढे सातत्याने 90 मीटर्सपेक्षा अधिक अंतराचे थ्रो करणे, हे माझे लक्ष्य असेल’, हे उद्गार आहेत, सुवर्णजेता ऑलिम्पियन नीरज चोप्रा याचे!
भालाफेक हा अतिशय टेक्निकल इव्हेंट असतो आणि बरेचसे ज्या-त्या दिवसातील फॉर्मवर अवलंबून असते. शनिवारी फायनलमध्ये 90.57 मीटर्सचा ऑलिम्पिक विक्रम मोडण्याचा माझा मानस होता. तो शक्य झाला नाही. पण, आता ऑलिम्पिक सुवर्ण जिंकल्यानंतर मी पुढील स्पर्धांबाबत स्वतंत्र तयारीवर भर देईन. भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यासाठी फॉरेन व्हिसा घेण्यासाठी माझे प्राधान्य असेल, असे तो म्हणाला.
23 वर्षीय चोप्राने ऑलिम्पिक तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी 13 जुलै रोजी आयोजित गेट्सशेड डायमंड लीगमधून माघार घेतली होती. तो निर्णय त्याच्या पथ्यावर पडला. आता पुढील कालावधीत लुसाने (26 ऑगस्ट), पॅरिस (28 ऑगस्ट) व झुरिच फायनल्स (9 सप्टेंबर) येथे पुरुष भालाफेक इव्हेंट्स होणार आहेत.
ऑलिम्पिकपूर्वी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेता आला, त्याचा लाभ झाल्याचे नीरजने यावेळी आवर्जून सांगितले. ‘ऑलिम्पिकपूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता व्हावी, यासाठी मी टॉप्स (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम), भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनशी संपर्क साधला आणि त्यांनीही माझी विनंती मान्य केली. त्यामुळेच, मी इथवर पोहोचू शकलो, याचा त्याने येथे उल्लेख केला. ‘ऑलिम्पिक सर्वोच्च व्यासपीठ असल्याने तेथे सहभागी होताना दडपण असणे नाकारता येत नाही. पण, अन्य स्पर्धांमध्ये भाग घेतो, तोच दृष्टिकोन मी येथेही ठेवला. त्यामुळे, दडपणाची चिंता राहिली नाही’ असे तो शेवटी म्हणाला.









