काही अटीवर वाहन-लाऊडस्पीकरकरिता परवानगी
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच लाऊडस्पीकरविना प्रचार करण्यात येत असून समर्थकांची गर्दी प्रचारफेरीत दिसत नाही. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या बंधनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र प्रचारासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असताना प्रशासनाने वाहने आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केवळ दोनच दिवस शहरात प्रचाराचा धडका ऐकावयास मिळणार आहे.
महापालिका निवडणूक म्हटली की, कार्यकर्त्यांची गर्दी, प्रचारसभा, कोपरा बैठका आणि लाऊडस्पीकरचा आवाज तसेच शहरात फिरणाऱया प्रचारांच्या वाहनांची गर्दी अशी परिस्थिती पहावयास मिळते. मात्र कोरोनामुळे गर्दीमध्ये प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून गर्दीविना आणि लाऊडस्पीकरविना प्रचार सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक आहे, असे वाटत नाही. महापालिकेच्या अनेक निवडणुका झाल्या पण महापालिका इतिहासात प्रथमच शांततेत आणि कोणताच गोंधळ नसताना निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या घाईगडबडीत दिसणारे कार्यकर्ते आणि प्रत्येक गल्लीत घुमणारा प्रचाराचा आवाज बंद होता. केवळ पाच जणांच्या उपस्थितीत प्रचार करण्याची सूचना करण्यात आल्याने काही मोजक्मयाच समर्थकांसह गेल्या चार दिवसांपासून प्रचार सुरू आहे. मात्र प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार करण्यासाठी वाहन आणि स्पीकरकरिता परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे शेवटचे दोन दिवस ‘मतदार बंधू आणि भगिणींनो…’असा आवाज शहरात घुमणार असून निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येण्याची शक्मयता आहे.
प्रचारासाठी वाहन आणि लाऊडस्पीकर लावण्याकरिता परवानगी मिळविण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी धावपळ चालविली आहे. वाहनासाठी निवडणूक कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर विविध अटींवर परवानगी देण्यात येत आहे. पण सदर वाहन ठराविक वॉर्ड मर्यादित वापरणे बंधनकारक असून वाहनावर परवानगीची प्रत लावणे आवश्यक आहे. तसेच वाहनावर लाऊडस्पीकर लावण्यासाठी स्थानिक पोलीस स्थानकाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच डॉल्बी वापरता येणार नाही, अशा विविध अटी घालण्यात आल्या आहेत.









