वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
बँकेच्या एटीएमचा वापर आत्तापर्यंत फक्त रक्कम काढणे आणि खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी केला जात होता. मात्र, आता एटीएममधून काही सुविधा मोफत मिळणार आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सुविधेमुळे बँकांमध्ये होणारी गर्दी आणि लांबच्यालांब लागणाऱया रांगाही कमी होणार असून, वेळेतही बचत होणार आहे.
प्राप्तिकर भरणे, मुदत ठेव खाते, इन्शुरन्स पॉलिसी हप्ता भरणे, वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणे, पैसे हस्तांतरीत करणे, खात्यात रक्कम जमा करणे, विविध बिले भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, चेकबुक मागणी करणे यासह वैष्णव देवी, शिर्डी साईबाबा, गुरुद्वारा साहेब, तिरुपती, जगन्नाथ, पलानी, रामकृष्ण मिशन, काशी विश्वनाथ, तुळजा भवानी आणि महालक्ष्मी मंदीर यासारख्या मंदिर आणि ट्रस्टला दान करण्याची सुविधा एटीएममध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.








