हिमाचल प्रदेशातील पालमपूर शहरातील आठ वर्षाची विद्यार्थिनी काशवी यंदा आठव्या इयत्तेच्या परीक्षेला बसणार आहे. तिला हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने या परीक्षेला बसण्याची विशेष अनुमती दिली आहे. काशवी अतिबुद्धिमान असून तिने पाचव्या वर्षी पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या तीन वर्षात आठ इयत्तांचा अभ्यास पूर्ण केला आहे. तिने वयाच्या आठव्या वषी आठवीची परीक्षा देण्यासाठी शाळेकडे अनुमती मागितली होती. तथापि, ती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली. उच्च न्यायालयाने तिची असामान्य बुद्धिमत्ता लक्षात घेऊन तिला ही अनुमती दिली.
पहिल्या इयत्तेपासूनच तिने दर तीन महिन्याला एका इयत्तेचा अभ्यास पूर्ण करण्याचा धडाका लावला होता. अशा प्रकारे ती सध्या केवळ तिसरीत असतानाच तिचा आठवीचा अभ्यासही पूर्ण झाला आहे. तिचे गणित अतिशय उत्तम असल्याने शिकवणीशिवायच ती या विषयाचा अभ्यास करू शकते. तिचे वडील संतोषकुमार हे शिक्षक असून त्यांनी आपल्या कन्येला मोठे प्रोत्साहन दिले आहे. तिच्या या असामान्य बुद्धिमत्तेचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. वयाच्या दहाव्या वषी दहावीची परीक्षा देण्याचा तिचा विचार आहे. आतापर्यंत भारतात दहाव्या वषी दहावीची परीक्षा दिलेले केवळ चार विद्यार्थी असल्याचे बोलले जाते.
काशवी ही एकपाठी असून तिला दैवी स्मरणशक्तीची देणगी लाभली आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास हे तिचे ध्येय प्रारंभापासून राहिले आहे. हिमाचल प्रदेश सरकारनेही तिच्या शिक्षणासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. तिच्या अभ्यासाची संपूर्ण जबाबदारी तिच्या गृहिणी असलेल्या आईने स्वीकारली आहे. अभ्यासाबरोबरच ती खेळ आणि इतर काही कलांमध्येही निपुण असल्याचे सांगितले जाते. तिच्या आठवीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.