14 हजार 686 कोरोनाबाधित घेताहेत घरीच उपचार : ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा : रेमडेसिवीर इंजेक्शन्सही उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या आठवडय़ाभरात जिल्हय़ातील 12 हजार 346 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृत्यूची टक्केवारी 0.42 टक्क्मयांवर असून आठवडाभरात 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर 14 हजार 686 जण आपापल्या घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे. जिल्हय़ात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सोमवारी सायंकाळी गेल्या आठ दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी जारी केला असून वेगवेगळय़ा कोविड केअर सेंटरमध्ये 319 जण उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण होण्याची टक्केवारी 33.56 वर असली तरी बरे होणाऱयांची टक्केवारी 68.67 वर आहे.
जिल्हय़ातील सरकारी व खासगी इस्पितळात 4 हजार 146 बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी 2 हजार 357 कोरोनाबाधित वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांना ऑक्सिजन दिले जात आहे. 1 एप्रिल ते 23 मे पर्यंत जिल्हय़ासाठी 23 हजार 283 रेमडेसिवीर लसींचा पुरवठा झाला आहे. सरकारी इस्पितळाला 19 हजार 531 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. 3 हजार 752 रेमडेसिवीर इंजेक्शन गोदामात असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे.खासगी इस्पितळांना 16 हजार 881 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. प्रत्येक तालुका केंद्रात वॉररूम सुरू केली आहे. होमआयसोलेशनमध्ये असणाऱया बाधितांशी संपर्क साधून त्यांच्या आरोग्याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीतपणे सुरू आहे. यापूर्वी जिल्हय़ाला 15 केएल ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. आता 22 केएल पुरवठा करण्यात येत आहे. याबरोबरच 3 संस्थांकडून 5 केएल ऑक्सिजन तयार करण्यात येत आहे. वेगवेगळय़ा इस्पितळांना त्यांच्या गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून सध्या तुटवडा नसल्याचा दावा जिल्हाधिकाऱयांनी केला आहे.
प्रत्येक तालुका केंद्रातही कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून या सेंटर्समध्ये 319 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. हॉस्टेल, कॉलेज, यात्रीनिवास आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये 1 हजार 77 बेड उपलब्ध आहेत. तर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये 320 बेड उपलब्ध आहेत. 18 ते 44 वर्षे वयाच्या 22 लाख 95 हजार 517 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात 5 हजार 75 जणांना लस देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.









