अखिलेश यांच्या अडचणी वाढणार
वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे मुस्लीम चेहरे म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे उत्तरप्रदेशचे फायरब्रँड नेते आझम खान वर्षभरापासून तुरुंगात कैद आहेत. सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझम खान यांच्या समर्थनार्थ पूर्ण जोर लावला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जो समुदाय समाजवादी पक्षासाठी रांग लावून मतदान करत आहे, त्याच्याच एका प्रभावशाली नेत्यावर होत असलेल्या कारवाईदम्यान अखिलेश यादव यांच्या मौनामुळे त्यांचे बेगडी ‘मुस्लीम प्रेम’ उघड झाल्याचा आरोप आता या समुदायात होत आहे.
उत्तरप्रदेशच्या राजकारणात सक्रीय होत असलेल्या एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांना मुस्लीम मतपेढी प्राप्त करण्यासाठी अखिलेश यादव यांच्याशीच लढावे लागणार असल्याचे चांगलेच ज्ञात आहे. अशा स्थितीत त्यांना आझम यांच्या मुद्दय़ाला स्पर्श करण्याचा निर्णय घेतला आहे. तुरुंगात कैद आझम यांची भेट घेण्याची तयारी ओवैसी यांनी चालविली असल्याचे संकेत मिळत आहेत. भेट घेण्यासंबंधीचा संदेश ओवैसी यांच्याकडून आझम यांना पाठविण्यात आला आहे. परंतु आझम खान यांनी हमी दिली तरच ही भेट शक्य आहे.









