हुतात्मादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी बहुल भाग अन्यायाने म्हैसूर प्रांताला जोडण्यात आला. यानंतर झालेल्या गोंधळामुळे मराठी भाषिकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली तर अनेकांनी कारागृहात अखेरचा श्वास घेतला. या हुतात्म्यांना सोमवार दि. 17 रोजी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. मराठी भाषिकांनी सकाळी 9 वा. हुतात्माचौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे केले आहे.
16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल स्विकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. भाषावार प्रांत रचनेमध्ये बेळगावसह संपूर्ण मराठी बहुल भाग म्हैसूर प्रांताला जोडण्यात आला. सीमाभागावर झालेल्या अन्यायामुळे प्रचंड गोंधळ उडाला. 17 जानेवारी रोजी सकाळपासूनच प्रक्षुब्ध जमाव रस्त्यावर उतरला. बेळगावमधील सर्व व्यवहार व बाजारपेठ ठप्प झाली होती. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अशा घोषणांनी मराठी बहुल भाग दणाणून निघाला होता. केंद्र सरकारच्या या चुकीच्या कृतीविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व चिड होती.
जमावाला शांत करण्यासाठी बाबुराव ठाकुर, बा. र. सुंठणकर, ऍड. राम आपटे, कृष्णा मेणसे, डॉ. कोवाडकर, बळवंतराव सायनाक यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु संतापलेले मराठी भाषिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करत जमाव रस्त्यावर उतरला. रस्त्यावर उतरलेले मराठी भाषिक पाहून म्हैसूर प्रांतातील पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी बेशूट गोळीबार सुरू केला.
या गोळीबारामध्ये मारूती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे व निपाणी येथे कमळाबाई मोहिते हुतात्मा झाल्या. सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले नागाप्पा होसूरकर, बाळू निलजकर, गोपाळ चौगुले यांची कारागृहात प्राणज्योत मालवली.
तेव्हापासून आजतागायत बेळगावसह संपूर्ण सीमाभागात हुतात्मादिन गांभीर्याने पाळला जातो. मराठी भाषिक आपले व्यवहार बंद करत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौक येथे जमतात. मागील 65 वर्षांपासून सीमाप्रश्न धगधगता ठेवण्यामध्ये या हुतात्म्यांचे मोठे योगदान असल्यामुळे मराठी भाषिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करत हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे आवाहन शहर म. ए. समिती, म. ए. महिला आघाडी, म. ए. युवा समिती, म. ए. तालुका समिती, बेळगाव जिल्हा शिवसेनेने केले आहे.
शिवसेनेतर्फे सीमावासियांना आवाहन
17 जानेवारी रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 9 वा. हुतात्मा चौक येथे मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानंतर कंग्राळी येथे अभिवादन करण्यात येणार आहे. सीमावासियांनी कोरोना नियावलीचे पालन करून अभिवादन करावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, राजू तुडयेकर, प्रविण तेजम, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, प्रकाश राऊत यांच्यासह शिवसैनिकांनी केले आहे.
खानापुरात आज हुतात्म्यांना अभिवादन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 8.30 वाजता खानापूर स्टेशनरोडवरील कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर नागरिकांनी उपस्थित रहावे तसेच हुतात्मा दिन अंत्यत गांभीर्याने पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील व म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव यांनी केले आहे.
या अभिवादन कार्यक्रमात म. ए. समिती युवा आघाडी तसेच तालुक्यातील शिवसैनिकही मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत. दरवर्षी तालुक्यातील म. ए. समितीचे दोन्ही गट हुतात्मा दिन वेगवेगळय़ा वेळेत करत होते. पण तालुक्यातील म. ए. समितीमध्ये एकी प्रस्थापित होऊन संघटना बलशाली व्हावी, यासाठी दोन्ही गटानी एकत्र येऊनच हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे तालुक्यातील म. ए. समिती कार्यकर्त्यांबरोबरच युवा आघाडी तसेच शिवसेनेनेही स्वागत केले आहे.
तसेच सर्वानी आपापले व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.









