संचारबंदीला प्रारंभ, 36 तासानंतर सोमवारी सकाळी सुरू होणार व्यवहार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात शनिवारी सायंकाळी सातपासून संचारबंदीला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभरही संचारबंदीसदृष्य लॉकडाऊन असणार आहे. आता सोमवारी सकाळी सातनंतरच सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होणार आहेत. जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी एक आदेश काढला आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. आता रविवारी पूर्ण प्रमाणात लॉकडाऊन पाळण्याचा आदेश देण्यात आला आहे. 24 व 31 मे या दोन्ही रविवारी बेळगावसह संपूर्ण राज्यात संचारबंदी असणार आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी यासंबंधी एक आदेश काढला आहे. कोरोना थोपविण्यासाठी बेळगाव शहर व जिल्हय़ात दोन्ही रविवारी पूर्णपणे संचारबंदीचा आदेश दिला आहे. अनावश्यक फिरणाऱयांवर कारवाई करण्याचा आदेश देतानाच अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.
आधीच ठरविलेली लग्ने होणार, पण..
कारखाने, उद्याने, दुकाने व आस्थापने बंद असणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेला परवानगी असणार आहे. दूध व औषध विक्रीला मुभा असणार आहे. या आधीच ठरविलेली लग्नेही होणार आहेत. मात्र परवानगी घेताना घातलेल्या नियमानुसार केवळ 50 वऱहाडींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून लग्न समारंभ करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बस, ऑटोरिक्षा वाहतूक बंद
या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सातपासूनच बेळगाव शहर व जिल्हय़ात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी 7 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत पूर्ण प्रमाणात संचारबंदी असणार आहे. बस, ऑटोरिक्षा वाहतूक बंद असणार आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. बसस्थानकावर प्रवाशांची तपासणी करुन एका बसमध्ये केवळ 30 प्रवाशांना प्रवासासाठी मुभा देण्यात येत होती. सोमवारी सकाळी सातपर्यंत परिवहन मंडळाची बससेवाही पूर्णपणे ठप्प असणार आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत.
काटेकोर अंमलबजावणी करा
रविवारी सकाळी सातपासून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी आपल्या अधिकाऱयांना केली आहे. या पूर्वीप्रमाणे दूध व भाजीपाला विक्रीलाही सकाळी आठनंतर परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती मिळाली आहे. शहर व उपनगरांमध्ये अनावश्यक फिरणाऱयांवर कारवाई करण्याची सूचनाही पोलीस अधिकाऱयांना करण्यात आली आहे. आता थेट सोमवारी सकाळी सातपासूनच सर्व व्यवहारांना सुरुवात होणार आहे.









