रत्नागिरी/ प्रतिनिधी
मंगळवारी जिह्यात दुसऱया टप्प्यातील सरपंच, उपसरपंच निवडणुका पार पडल्या. चिपळुणमधील दोन सदस्यांचे बेपत्ता होणे, संगमेश्वर तालुक्यात नावडी ग्रामपंचायतीमध्ये भरलेला अर्ज मागे घेतल्याने रिक्त राहिलेले सरपंचपद, पाली ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणाचा झालेला घोळ व काही ठिकाणी पडद्यामागे झालेली हातमिळवणी अशा विविध राजकीय घडामोडींची फोडणी वगळता बहुतांश ठिकाणी या निवडी शांततेत पार पडल्या. बुधवारी उर्वरित सरपंच, उपसंपंच निवडी पार पडणार असून यानंतरच जिल्हय़ातील ग्रामपंचायतींमधील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरीत 18 ग्रा.पं. बिनविरोध
रत्नागिरी तालुक्यातील प्रथम टप्प्यातील 28 ग्रामपंचायतींसाठी सरपंच निवड मंगळवारी पार पडली. यातील 18 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवड बिनविरोध पार पडली. नाणिज व ओरी येथे हात वर करून तर कासारी येथे प्रत्यक्ष निवडणूकीने सरपंच निवड झाली. प्रतिष्ठेच्या नाचणे ग्रामपंचायतीवर सरपंचपदी सेनेचे ऋषीकेश उर्फ भैय्या भोंगले यांची व निलेखा नाईक यांची उपसरपंचपदी निवड झाली. माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांनी सरपंच होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्ष संघटनेने त्यांना पुढील वेळी ही संधी देण्याचे आश्वासन दिले. यानंतर घोसाळे यांनी यानंतर केव्हाही हे पद घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. आरक्षण प्रक्रीयेत घोळ झाल्याने पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा तिढा कायम आहे. बहुचर्चित कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना व भाजपाकडे समान सदस्य असल्याने सत्तेची चावी अपक्ष उमेदवाराच्या हाती जाण्याची शक्यता होती. येथे शेवटच्या क्षणी सेना आणि भाजप युती होऊन पहिल्या दिड वर्षांसाठी शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी मात्र ही युती नसल्याचे सांगितले आहे. मिऱया ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेला खिंडार पाडत भाजपचा सरपंच बसवून मागील पराभवाचे उट्टे काढले आहे, याला दोन अपक्षांची साथ मिळाली.
खेड तालुक्यात 87 सरपंच विराजमान
खेड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली. मुरडेच्या सरपंचपदी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून 68 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला सरपंच सोनाली जाधव यांची निवड झाली आहे. तालुक्यातील सर्वाधिक सदस्य असलेल्या भरणे सरपंचपदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी व मनसेत हातमिळवणी झाली. पहिल्या अडीच वर्षासाठी सरपंचपदी राष्ट्रवादीचे संदीप खेराडे व उपसरपंचपदी मनसेच्या राजेश मोरे यांना संधी मिळाली आहे.
चिपळुणात दोन सदस्य गायब
चिपळूण तालुक्यात 49 ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी सरपंच निवडणूक पार पडली. कादवड ग्रामपंचायतींमधील महेश पवार व सुवर्णा सकपाळ हे दोन सदस्य सोमवारपासून गायब असल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलने पोलीस स्थानकात धाव घेत याबाबत विरोधकांवर ठपका ठेवला आहे. सावर्डेत माजी पं. स. सभापती समीक्षा बागवे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
संगमेश्वरात अचानक अर्ज मागे
संगमेश्वर तालुक्यात नावडी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सादर केलेला अर्ज अचानक मागे घेण्यात आल्याने येथील सरपंच पद रिक्त राहिले आहे. उपसरपंच पदी विवेक शेरे यांची निवड झाली आहे. तालुक्यात उर्वरित ठिकाणी निवड प्रक्रीया शांततेत पार पडली. बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवड झाली असून त्यातही गाव पॅनेलचे वर्चस्व आहे.









