राय पंचायत घराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्याचा दावा
प्रतिनिधी / मडगाव
कुडतरी मतदारसंघात कोव्हीड-19 ने प्रवेश केला असून आतापर्यंत या मतदारसंघातील राय व कुडतरी गावात मिळून 17 केसीस समोर आलेल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारचे भितीचे वातावरण तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर कुडतरी बाजार आज शुक्रवारपासून पुढील 7 दिवस बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा विचार आहे.
सरकारी आकडेवारीनुसार कुडतरी गावात 10 तर राय गावात 7 कोरोनाची बाधा झालेली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कुडतरी बाजार आजपासून पुढील 7 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुडतरीचे कार्यकारी सरपंच सायमन बार्रेटो यांनी दिली.
लॉकडानच्यावेळी कुडतरी गावात पोलीस यायचे व त्यांचा गावात धाक असायचा. मात्र सध्या कुडतरी गावात पोलीसच येत नसल्यामुळे शिस्तीसाठी गावच्याच लोकांनाच आता पावले उचलावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडतरी गावात पोलीस पाठवावे म्हणून पोलीस खात्याकडे कुडतरी पंचायतीने मागणी केलेली आहे. कुडतरी बाजारात दोन, मायणा येथे 2 व कार्मी कपेलजवळ 1 पोलीस तैनात करण्याचा विचार असून त्यासाठी पोलीस खात्याच्या साहाय्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संशय नको म्हणून कुडतरी गावातील अनेकजण कुडतरी आरोग्य केदांत जाऊन तपासणी करुन घेत आहेत. मात्र या आरोग्य केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याचे जाणवते. या केंद्रात ज्यादा वैद्यकीय अधिकारी वा कर्मचारी पाठवावेत अशी विनंती आरोग्य संचालनालयाला करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. बार्रेटो यांनी दिली.
कुडतरी गावातील आकडा 10 जरी असला तरी हा आकडा दोन कुटूंबापुरता मर्यादीत आहे. एका कुटूंबात चार तर दुसऱया एका कुटूंबात उर्वरित आहे. तरीही धोका नको म्हणून गावातील अनेकजण स्वतःची तपासणी करुन घेत आहेत, ते म्हणाले.
राय गावात 7 रुग्ण सापडलेले असले तरी मनोरा व केव्हण या दोन प्रभागापूरताच हा आकडा मर्यादीत आहे. अन्यत्र नव्हे. यातील एकटा राय पंचायतीत कर भरण्यासाठी आला होता. संशय नको म्हणून गुरुवारी संपूर्ण राय पंचायत इमारतीत फवारणी करण्यात आलेली असल्याची माहिती राय गावचे उपसरपंच मारियो डिसौझा यांनी दिली.









