बैठक निष्फळ ठरल्यास प्रजासत्ताकदिनी ट्रक्टर मोर्चा काढण्याचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील 39 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर आज, सोमवारी होणाऱया चर्चेअंती तरी यशस्वी तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आतापर्यंत सरकारशी वारंवार चर्चा होऊनही मार्ग निघू शकलेला नाही. सरकारही नवे कृषी कायदे मागे घेण्यास राजी नसल्यामुळे चर्चेचा तिढा कायम असल्यामुळे आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
ऐन कडाक्मयाच्या थंडीत पंजाब-हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. अशात 4 जानेवारीला शेतकरी आणि सरकारची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. ही चर्चा निष्फळ ठरली तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. आता तर शेतकऱयांनी उद्याची चर्चा निष्फळ ठरली तर प्रजासत्ताक दिनी ट्रक्टर मोर्चा काढू असेही म्हटले आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि शेतमालाच्या आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर तरतूद करावी यासाठी शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे.
केंद्र सरकारविरोधात शेतकऱयांनी आक्रमक पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 26 जानेवारीच्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीत ट्रक्टर परेड करु. राजधानी दिल्लीतील मुख्य परेडनंतर किसान परेड होईल असे शेतकरी नेते दर्शनपाल सिंग आणि अभिमन्यू कोहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आतापर्यंत शेतकरी संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने तोडग्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, सरकारच्या ताठर भूमिकेमुळे चर्चेच्या फेऱया वारंवार निष्फळ ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी सरकारशी होणाऱया चर्चेपूर्वी रविवारी पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांची बैठक झाल्याचे समजते.
आंदोलनादरम्यान 54 जणांचा मृत्यू
नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर रविवारी आणखी 4 शेतकऱयांचा मृत्यू झाला. यातील दोघे हरियाणा आणि दोघे पंजाबचे रहिवासी होते. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी काही जणांनी आत्महत्या केली असून काहींचा आजारपण, थंडी आणि हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. 26 नोव्हेंबरपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मृत्यूंच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबीय आणि शेतकरी संघटनांकडून नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला नोकरीची मागणी जोर धरू लागली आहे. यादरम्यान, 54 शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे.