प्रतिनिधी / सांगली
अत्यंत चुरशीने पार पडलेल्या जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने वरचष्मा राखला. पलूस, कडेगाव आणि जत तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली. खानापूर, आटपाडी तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार अनिल बाबर समर्थकांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. मिरज तालुक्यातील मालगाव, म्हैसाळसह मोठ्या ग्रामपंचायतांमध्ये राष्ट्रवादीप्रणित पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पलूस आणि कडेगाव तालुक्यात भाजप तसेच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळमध्ये आमदार सुमनताई पाटील यांनी पुन्हा वर्चस्व राखले. खासदार संजय पाटील गट बॅकफुटवर गेला.
आता 29 रोजी होणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे नवनिर्वाचित सदस्यांच्या नजरा लागल्या आहेत. प्रस्थापितांनी गड राखण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले. पण भिलवडी, सावळज, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, अंकले, शेगाव, सनमडी, गुड्डापूर, उमराणीसह अनेक मोठ्या गावांनी प्रस्थापितांना दणका देत सत्तांतर घडवले. लोकसंख्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदशनशिल गावांची संख्या मिरज तालुक्यात जास्त होती. मालगाव, मल्लेवाडी, शिंदेवाडीत सत्तांतर झाले. कवठेपिरान, आरग, कळंबीत सत्ताधाऱ्यांनी गड राखले. कळंबीचे सुभाष पाटील व माजी सरपंच बी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणित पॅनेलने यश मिळवले. कवठेपिरानमध्ये माजी सरपंच भीमराव माने यांनी सत्ता राखली. मालगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आप्पासाहेब हुळ्ळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला अवघी एक जागा मिळाली. तर भाजपच्याच दोन पॅनेलमध्ये चुरशीने लढत झाली. कवलापूरमध्ये राष्ट्रवादीचे भानुदास पाटील यांच्या गटाची सत्ता आली.
कवठेमहांकाळ, तासगावमध्ये राष्ट्रवादीच अव्वल
तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच अव्वल ठरली. तासगावमध्ये सतरा तर कवठेमहांकाळमध्ये सहा ग्रामपंचायतीवर सत्ता आली. तेथे भाजपचे खासदार संजय पाटील गट बॅकफुटवर गेला. कवठेमहांकाळमध्ये 10 पैकी काँग्रेसने सहा, अजितराव घोरपडे आणि खासदार संजय पाटील गटाला प्रत्येकी दोन तर बनेवाडी येथे संयुक्त पॅनेल विजयी झाले. स्थानिक कार्यकर्त्यांनी सोयीस्कर आघाड्या करून सत्तेचे सिंहासन ताब्यात ठेवले. राजकीय विरोधकही एकत्र झाले. काही ठिकाणी खासदार संजयकाका आणि आमदार सुमनताई यांच्या कार्यकर्त्यांनी, तर काही गावात अजितराव घोरपडे आणि आमदार सुमनताई पाटील यांचेही कार्यकर्ते एकत्र आले आणि जिंकले.
यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना झाला. चोरोची येथे घोरपडे समर्थक राजाराम पाटील यांच्या पॅनेलने राष्ट्रवादीचा धुवा उडवित नऊच्या नऊ जागा जिंकल्या. त्यासाठी आमदार सुमनताई पाटील, खासदार गटाचे जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, सुरेश पाटील यांनी ताकद लावली होती.
नांगोळेमध्ये सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब कोळेकर यांनी पक्कड कायम राखून नऊपैकी आठ जागांवर विजय प्राप्त केला. एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली.
तासगावात राष्ट्रवादीने मांजर्डे, सावळज, येळावी, गोटेवाडी, दहीवडी, पाडळी, विजयनगर, लोढे, गव्हाण, डोंगरसोनी, जरंडी, वडगाव, राजापूर, शिरगांव वि., यमगरवाडी, आळते, वज्रचौंडी या 17 ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध केले. भाजपने नागावकवठे, कवठेएकंद, धुळगाव, गौरगाव, हातनोली, वाघापूर, मोराळेपेड, पेड, बोरगाव, जुळेवाडी, गौरगाव, हातनूर या 13 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. ढवळी, तुरची, विसापूर, सिद्धेवाडी, धोंडेवाडीवर संमिश्र सत्ता आली. निंबळक येथे स्वतंत्र सत्ता आली आहे. सावळज, येळावी, गोटेवाडी, नागांवकवठे, कवठेएकंद, बोरगाव येथे सत्तांतर झाले.
पलूस आणि कडेगावमध्ये काँग्रेसच
पलूस आणि कडेगावमध्ये कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पलूसमधील 12 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवत वरचष्मा कायम ठेवला. भिलवडी, दह्यारी आणि तावदरवाडीत भाजपचा पराभव करत सत्तांतर घडवले. तीन ग्रामपंचायतीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने सत्ता मिळवली. सूर्यगावमध्ये सर्व पक्षीय स्वामी समर्थ पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली. बुरूंगवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खाते उघडले. एकूणच काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करून भाजपला धक्का दिला आहे.
भिलवडीचे जिल्हा परिषद सदस्य भैय्या वाळवेकर आणि दह्यारीच्या सदस्या अश्विनीताई पाटील या भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. पलूस पंचायत समितीवर भाजप व राष्ट्रवादीची एकत्र सत्ता आहे. मात्र विधानसभेला राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली. भाजपने राष्ट्रवादीचे अरूण लाड यांच्या विरूद्ध लढत दिली होती. कडेगाव तालुक्यातही डॉ. कदम यांचा करिष्मा कामाला आल्याने सर्व नऊ ग्रामपंचायती काँग्रेसने ताब्यात ठेवल्या.
खानापूरमध्ये आमदार बाबर प्रणित सेनेचा भगवा
खानापूर तालुक्यातील ग्रामपंचयतीच्या निकालात आमदार अनिल बाबर गटाने बाजी मारली. माहुली, नागेवाडी, खंबाळे (भा.), रेणावी येथील चुरशीच्या निवडणूकीत आमदार गटाने भगवा फडकवला. पोसेवाडी, शेडगेवाडी आणि भिकवडी (बु.) येथे माजी आमदार सदाशिव पाटील गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. मंगरूळ येथे ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील यांनी सत्ता आबाधीत ठेवली. आटपाडी तालुक्यातही शेटफळे, घरनिकी, लेंगरेवाडी,तळेवाडी,देशमुखवाडी येथे दिग्गजांना पराभवाचा धक्का देत पाच ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले.
जतमध्ये काँग्रेस अव्वल
जतमध्ये काँग्रेसने बारा, भाजपने दहा ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. स्थानिक आघाड्या सात ठिकाणी विजयी झाल्या. पण काँग्रेसला निर्णायक मतदान असणारी मोठी गावे गमवावी लागली. राष्ट्रवादी, सेना, रासप,दलित र्पथरेनही आपले उमेदवार विजयी झाल्याचे दावे केले आहेत.
नियतीने हिरावले, पण जनतेने जिंकवले
ढवळी येथील उपसरपंच अतुल पाटील ग्रामपंचायत प्रचाराच्या मैदानाबरोबरच क्रिकेटच्याही मैदानावर रमले होते. पण क्रिकेटच्या मैदानावर यष्टीरक्षण करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या निकालानंतर त्यांच्या गटाचीच ढवळी ग्रामपंचायतीवर सत्ता आली. विशेष म्हणजे ते स्वतः 57 मतांनी निवडूनही आले. नियतीने हिरावलेल्या या उमद्या नेत्याला जनतेने मात्र जिंकवले. निकालानंतर गड आला पण सिंह गेला अशी अवस्था त्यांच्या समर्थकांची झाली.
पालकमंत्र्यांच्या सासुरवाडीत भाजपचा झेंडा
मिरज तालुक्यात अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. तालुक्यातील म्हैसाळमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांचे मेहुणे मनोज शिंदे आणि भाजपचे शहर जिल्हाअध्यक्ष दीपक शिंदे यांच्या गटात चुरशीने लढत झाली. दीपक शिंदे गटाला 15 तर मनोज शिंदे गटाला केवळ दोन जागा मिळाल्या.
या गावात सत्तांतर
मिरज तालुक्यातील मालगाव, एरंडोली, मल्लेवाडी, म्हैसाळ, शिंदेवाडी, आटपाडी तालुक्यातील शेटफळे, घरनिकी, लेंगरेवाडी, तळेवाडी, देशमुखवाडी, खानापूर तालुक्यातील माहुली जत तालुक्यातील उटगी, शेगाव, सनमडी, तिकोंडी, उमराणी, अंकले, गुड्डापूर, तासगाव तालुक्यातील सावळज, येळावी, गोटेवाडी, कवठेएकंद, बोरगाव, पलूस तालुक्यातील भिलवडी, तावदरवाडी, दह्यारी, कवठेमंकाळ तालुक्यातील इरळी, म्हैसाळ एम आणि थबडेवाडी येथे मतदारांनी सत्ताधाऱ्यांना पराभूत करत सत्तांतर घडवले.
पक्षनिहाय जागा
भाजपा 34 |
काँग्रेस 33 |
राष्ट्रवादी 29 |
शिवसेना 17 |
स्थानिक आघाड्या 39 |