अमेरिका-इराणमधील तणावात प्रचंड भर : भारतीयांच्या चिंता वाढल्या, केंद्र सरकार सतर्क
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत असल्याने युद्धाची भीती निर्माण झाली आहे. इराणचा जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्यावर दोन्ही देशांकडून आक्रमक पावले उचलली जात आहेत. तीन दशकांनी पहिल्यांदाच इराण-इराक समवेत पूर्ण मध्यपूर्वेत राहत असलेल्या भारतीयांवरही संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत.
तीन दशकांपूर्वी इराकने कुवेतवर हल्ला केल्यावर भारत सरकारने सर्वात मोठी बचावमोहीम राबविली होती. एअर इंडियाच्या विमानांनी सलग 58 दिवसांपर्यंत 488 उड्डाणे करत सुमारे 1 लाख 70 हजार लोकांना सुखरुप बाहेर काढले होते. सद्यकाळात पुन्हा हीच स्थिती उभी राहताना दिसून येत आहे. तेहरानहून युक्रेनला जाणारे विमान कोसळले आहे. हे विमान अमेरिका किंवा इराणच्या हल्ल्यात सापडल्याची शंका व्यक्त होत आहे. 1988 मध्येही अमेरिकेने अशाचप्रकारे एक विमान पाडविले होते आणि त्यात 10 भारतीयांसह एकूण 280 प्रवासी मारले गेले होते.
मध्यपूर्वेतील संकट
केवळ इराण आणि इराक किंवा अमेरिका नव्हे तर याचा तणाव पूर्ण मध्यपूर्वेत दिसून येतोय. मध्यपूर्वेत 18 देश असून यात इराक, इराक, येमेन, युएई, तुर्कस्तान, सीरिया, सौदी अरेबिया, कतार, पॅलेस्टाईन, ओमान, लेबनॉन, कुवैत, जॉर्डन, इस्रायल, इजिप्त, सायप्रस, बहारीन यांचा समावेश आहे. या देशांमध्ये 10 लाख भारतीयांचे वास्तव्य आहे. इराणमध्ये 4273 भारतीय राहत असून इराकमध्ये हे प्रमाण 10 हजारांनजीक आहे.
भारतीयांचे वास्तव्य
मध्यपूर्वेत संयुक्त अरब अमिरातमध्ये सर्वाधिक 3105486 भारतीय आहेत. तर सौदी अरेबियात 2814568 भारतीयांचे वास्तव्य आहे. कुवैतमध्ये 929903 भारतीय राहत आहेत. पाचव्या क्रमांकावर कतार तसेच ओमान हे देश आहेत. त्यानंतर बहारीन, इस्रायल, जॉर्डन, येमेन, इराक, लेबनॉन, सायप्रस, इराण, इजिप्त, तुर्कस्तान, सीरिया आणि पॅलेस्टाईनचा क्रम लागतो.









