सणवार, लग्नसमारंभ म्हणजे महिलांसाठी नटण्यामुरडण्याची संधी. या दिवसात महिला छान छान कपडे परिधान करतात. मेकअपने सौंदर्य खुलवतात. ठेवणीतले दागिने घालतात. यासोबतच आकर्षक केशरचना केली तर सौंदर्याला चारचांद लागतात. आगळ्यावेगळ्या केशरचनेमुळे तुमचा लूक पूर्णपणे बदलून जातो. सणावारी महिलांचं पारंपरिक केशरचनेला प्राधान्य असायचं. पण काळानुरूप अनेक आधुनिक प्रवाह यात सामील झाले आहेत. अंबाडा, खोपा, सागरवेणी यांसारख्या पारंपरिक प्रकारांबरोबर मेस्सी बन, फ्रेंच रोल, साईड बन असे आधुनिक प्रकारही लोकप्रिय झाले आहेत. वेस्टर्न किंवा इंडोवेस्टर्न पेहरावावर अशा केशरचना शोभून दिसतात. केशरचना करण्यापूर्वी काही पथ्यं पाळणं गरजेचं आहे, त्याविषयी…
* केशरचना करताना केस खूप जोराने हाताळू नयेत. अशाने केस तुटण्याचा किंवा मुळं कमकुवत होण्याचा धोका संभवतो.
* सध्या साध्या आणि सुटसुटीत केशरचनांचा ट्रेंड आहे. त्यामुळे सोपी आणि आकर्षक केशरचना करण्यावर भर द्या.
* नवीन केशरचना करण्यापूर्वी एकदा प्रात्यक्षिक करणं गरजेचं आहे. यामुळे केशरचना कॅरी करणं सोपं जाईल.
* केशरचना करण्यापूर्वी केस स्वच्छ धुवून कंडिशनिंग करून घ्या. केसांमध्ये तेल राहणार नाही याची काळजी घ्या.
* हटके केशरचना करण्यासाठी केसांमधील काही बटा हायलाईट करा. या बटांमुळे केशरचनेमध्ये हटके लूक मिळण्यास मदत होते.
* केलेली केशरचना काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. कारण स्प्रे केल्याने केस कठीण झालेले असतात.
* स्वतः केशरचना करणं शक्य नसल्यास तयार केशरचना वापरू शकता. या केशरचना वापरून झटपट तयार होता येईल.









