निवडणुकीत आर. एम. चौगुले पुरस्कृत आंबेवाडी ग्रा. पं. महाविकास आघाडीची बाजी
वार्ताहर / हिंडलगा
आंबेवाडी ग्रा. पं. च्या अध्यक्षपदासाठी मंगळवार दि. 2 रोजी झालेल्या निवडणुकीत आर. एम. चौगुले पुरस्कृत आंबेवाडी ग्राम पंचायत महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन पारिस पाटील यांनी 26 पैकी 14 मते घेऊन बाजी मारली. तर प्रतिस्पर्धी उमेदवार जोतिबा शहापूरकर यांना 12 मतांवर समाधान मानावे लागले. तर अनुसूचित जमातीच्या एकमेव उमेदवार असल्याने यापूर्वीच सरिता नाईक यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. अध्यक्षपदावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी दोन गट आमने-सामने आले होते. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. काही सदस्यांना शेवटच्या क्षणापर्यंत अज्ञातस्थळी ठेवले होते. त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सर्व सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिकेद्वारे गुप्त मतदान घेण्यात आले. त्यामध्ये चेतन पाटील यांना 14 मते आणि प्रतिस्पर्धी जोतिबा शहापूरकर यांना 12 मते मिळाल्याने चेतन पाटील यांची दोन मतांच्या फरकाने अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी श्री. बिरादार यांनी जाहीर केले.
आंबेवाडी ग्रा. पं. मध्ये मण्णूर, आंबेवाडी आणि गोजगा या तीन गावाच्या एकूण 26 सदस्यांचा सहभाग आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी 26 पैकी 14 मते घेणे जुरुरी होते. यासाठी गटबाजीचे राजकारण झाल्याने दोघा सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर तिन्ही गावातील समर्थक व आंबेवाडी ग्राम पंचायत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
निवडणूक यशस्वी करण्यासाठी अभियंते आर. एम. चौगुले, विनय कदम, एम. एच. कदम, एल. के. कालकुंद्री, एस. आर. कालकुंद्री, राजू जैन, नारायण कालकुंद्री, भरमाणी मंडोळकर, खाचू तरळे, सागर कटगेण्णावर, शिवाजी मंडोळकर, बाळू आनंदाचे, डॉ. भरत चौगुले, सुजीत मंडोळकर, यल्लाप्पा शहापूरकर, भाऊ सांबरेकर, विजय मंडोळकर, पी. के. तरळे, शिवाजी राक्षे, मल्लाप्पा सांबरेकर, विक्रम यळगुकर, निरंजन अष्टेकर, यल्लाप्पा होनगेकर, निलेथ मठद, संजू कांबळे, रामा नाईक आदींनी परिश्रम घेतले.









