केपे तालुक्यातील रुग्णांची संख्या 5 वर
वार्ताहर / केपे
मोरपिर्ला, केपे येथे एक कदंब कर्मचारी व त्याची पत्नी असे दोन कोरोना रुग्ण सापडले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने सदर कर्मचाऱयाच्या पत्नीची आईही कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले असून सदर महिला नवेवाडा-आकामळ, आंबावली येथील आहे. तिला शिरोडा येथील कोरोना निगा केंद्रात पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून यामुळे केपे तालुक्मयात आता कोरोना रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
या पार्श्वभूमीवर आंबावली पंचायत क्षेत्रातही मंगळवारपासून आठ दिवस लॉकडाऊन केला जाणार असून आज सोमवारी होणाऱया बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आंबावली पंचायतीच्या सरपंच जासिंता डायस यांनी सागितले. केपे तालुक्मयात असोल्डा येथे आढळलेला पहिला कोरोना रुग्ण हा वास्को परिसरात काम करणारा आरोग्य खात्याच्या एक कर्मचारी आहे. त्यानंतर आरोग्य खात्याचीच कावरेपिर्ला भागात राहणारी एक परिचारिका कोरोना रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मोरपिर्ला-केपे या भागातील कदंब कर्मचारी व त्याची पत्नी पॉझिटिव्ह सापडली होती. यामुळे मोरपिर्ला पंचायतीने लॉकडाऊन केले आहे.
सदर कदंब कर्मचारी आपल्या पत्नीच्या माहेरी व इतर भागांतील काही जणांच्या संपर्कात आल्याची चर्चा चालू होती. त्यानंतर नवेवाडा, आकामळ-आंबावली येथील कुटुंबातील सदस्याची चाचणी घेतली असता त्यात सदर कर्मचाऱयाच्या पत्नीची आई कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे आंबावली पंचायतीपर्यंत कोरोना पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज लॉकडाऊनसंदर्भात पंचायतीची बैठक
यासंबंधी आंबावलीच्या सरपंच डायस यांना विचारले असता त्यांनी त्यास दुजोरा दिला. आंबावलीतील सदर कोरोनाबाधित महिलेला शिरोडा येथे पाठविण्यात आले असून तिच्या घरातील इतर व्यक्तींना घरात विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. या भागातील अन्य लोकांनाही बाहेर पडू नका असे सांगितले आहे. पंचायत भागात सापडलेला हा पहिला रुग्ण असून फैलाव होऊ नये याकरिता संपूर्ण पंचायत क्षेत्र मंगळवारपासून 8 दिवस लॉकडाऊन करण्याचा विचार आहे. आज पंचायतीची बैठक बोलावून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे डायस यांनी स्पष्ट केले.









